www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्ली गँगरेप प्रकरणातल्या आरोपींना कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांसमोर निकालावर गंभीर टीका केली होती. त्याची दखल बार काऊन्सिलनं घेतलीय. त्यानंतर आज आरोपींचे वकील ए. पी. सिंग यांनी आपल्या त्या विधानाचं समर्थन केलंच पण त्याचबरोबर त्यांनी ‘आपल्या मुलीने विवाहपूर्व शरीरसंबंध प्रस्थापित केले असते तर तिला पेट्रोल टाकून पेटवून दिलं असतं’ असं भयानक विधान करून आणखी एक वाद ओढवून घेतलाय.
अनेक स्वयंसेवी संघटना आणि इतर संस्थांनी नोंदविलेल्या तक्रारींची दखल दिल्ली बार काऊन्सिलनं घेतलीय.
अॅडव्होकेट ए. पी. सिंग यांनी दिल्ली बलात्कार प्रकरणातील पीडितेचा उल्लेख करून ‘माझी मुलीनं अशा पद्धतीनं विवाहाआधीच लैंगिक संबंध प्रस्थापित केले असते आणि ती अपरात्री आपल्या बॉयफ्रेंडसोबत फिरताना दिसली असती तर मी तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं असतं... आणि माझा सगळ्या पालकांनाही हाच सल्ला आहे, त्यांनीही अशावेळी हीच भूमिका घ्यायला हवी’ असं धक्कादायक विधान केलंय.
‘सरकारच्या इशाऱ्याखाली कोर्टानं दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावलीय. न्यायाधीशांनी कोणत्याही पुराव्यांना आणि तत्थ्यांना न बघता केवळ सरकारच्या दबावाखाली येऊन हा निर्णय दिलाय’ असा आरोप शुक्रवारी निकालानंतर सिंग यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर वकिलांच्या संघटनेनंही आक्षेप नोंदवलाय. वकिलांच्या संघटनेकडूनही त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.