www.24taas.com,नवी दिल्ली
भारतातील धवल क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं काल निधन झालं. डॉक्टर कुरियन ९०वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज आणंदमध्ये ४वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
वर्गीस यांच्यामुळे देशाला एक वेगळी ओळख मिळाली. त्यांच्या विचारांमुळेच जगातल्या दूध उत्पादक देशांमध्ये भारताला स्थान मिळालं. डॉक्टर वर्गीस कुरियन. एक असामन्य व्यक्तीमत्व. ज्यांनी भारताला जगात मानाचं स्थान मिळवून दिलं. जगात सर्वात जास्त दूध उत्पादन करणा-या देशांच्या पंक्तीत भारताला बसण्याचा मान मिळाला तो डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्यामुळेच.कुरियनं यांनी एका छोट्याशा गावातून मोहिम हाती घेतली आणि बघता बघता त्यांची ही मोहिम देशव्यापी झाली.
२६नोव्हेंबर १९२१ मध्ये केरळच्या कालिकत इथं वर्गीस कुरियन यांचा जन्म झाला. चेन्नईच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी सुरूवातीला टिस्केमध्ये नोकरी केली त्यानंतर पुढील दोन वर्षांत त्यांनी स्कॉलरशिप मिळवून डेअरी इंजिनिअरींगवर अमेरिकेत अभ्यास सुरू केला. अमेरिकेतून परल्यानंतर गुजरातमधील आणंद हेच त्यांचं घर झालं. १३ मे १९४९ला कुरीयन आणंदमध्ये आले. हेच आणंद पुढे आपल्याला देशाच्या नकाशावर पोहचवेल याची जाणीवही त्यांना त्यावेळी नव्हती.
धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरीयन यांच्या परिश्रमांमुळेच भारताचं नाव सर्वाधिक दूध उत्पादन करणा-या देशांच्या यादीत समाविष्ट झालं. नॅशन डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष राहिलेल्या कुरीयन यांनी देशातल्या दूध उत्पादकांना नवी दिशा दिली ज्यामुळे देशातल्या लाखो दूध उत्पादकांचं नशीबच बदलून गेलं.
तो १९६० च्या दशक समाप्तीचा काळ होता. त्याच वेळी वर्गीस कुरीयन यांनी ऑपरेशन फ्लड या नावानं एका नव्या दिशेनं वाटचाल सुरू केली होती. देशात दूधांची गंगा आणणं हेच त्यांच्या मोहिमेचं उद्दीष्ट होतं. या अतुलनीय कामगिरीबद्दल वर्गीस कुरीयन यांना १९६५मध्ये पद्मश्री, १९६६मध्ये पद्मभूषण, १९८६ला कृषी रत्न तर १९९९मध्ये पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.