बोमडिला : चीन विरोधात भारतानं आपला कधीच वापर करुन घेतला नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी चीनला सुनावलं आहे. सध्या दलाई लामा अरुणाचल प्रदेशच्या दौ-यावर आहेत. त्यामुळे तिळपापड झालेल्या चीननं बिजिंगमध्ये भारतविरोधी अपप्रचाराची मोहीम उघडली आहे.
भारत दलाई लामा यांचा साधन म्हणून चीनविरोधात जाणिवपूर्वक वापर करत असल्याचा आरोप चीननं केलाय. त्यावर दलाई लामा यांनी भारताच्या निःष्पक्ष भूमिकेचं कौतुक करत आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या भारताच्या तटस्थ भूमिकेचीही एकप्रकारे प्रशंसाच केली.
अरुणाचल प्रदेशमधल्या बोमडिलामध्ये ते बोलत होते. दरम्यान आपण प्राचीन भारतीय विचारांचे दूत असून, आपण जिथे जातो तिथे अहिंसा, शांती, सौहार्द आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांबाबतच बोलत असल्याचंही दलाई लामा यांनी यावेळी सांगितलं. त्याचवेळी तिबेटची भूमिका मांडताना, आपण स्वातंत्र्याची मागणी करत नसून चीनी सरकारनं आम्हाला अर्थपूर्ण स्वायत्तता द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.
ईशान्य भारतातल्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये सुमारे आठवडाभराच्या भेटीवर दलाई लामा आहेत. अरुणाचल प्रदेशच्या दौ-याकरता परवानगी दिल्याबद्दल दलाई लामा यांनी यावेळी भारत सरकारचे आवर्जून आभारही मानले.