नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या काँग्रेसला आता बंडाळीनं ग्रासलयं. महाराष्ट्र, आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये राजीनामा सत्र सुरु झालयं. आता यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे पडलाय.
काँग्रेससाठी 2014 हे वर्ष संकटाचं ठरतंय. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला. त्या धक्कातून काँग्रेस अजून सावरलेली नसतांनाच राज्याराज्यात बंडखोरी होतेय. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतांनाच महाराष्ट्रात उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावलंय.
मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं राणे नाराज आहेत. नारायण राणेंच्या राजीनामाअस्त्रावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होताहेत.
तर दुसरीकडे आसाममध्येही काँग्रेसचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांच्या विरोधात बंड सुरू झालंय. आसामचे आरोग्य आणि शिक्षणमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्यासह काँग्रेसच्या 18 आमदारांनीही राजीनामे दिलेत. आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ सरमा यांच्या नेतृत्वाखाली बंड सुरू झालंय.
हे कमी झालं म्हणून की काय जम्मू काश्मीरमधील काँग्रेस नेते आणि माजी खासदार लाल सिंग चौधरी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. चौधरींचं तिकीट कापून ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना काँग्रेसनं लोकसभेची उमेदवारी दिली, त्यामुळं नाराज चौधरींनी काँग्रेसलाच रामराम ठोकलाय.
महाराष्ट्र, आसाम आणि जम्मू काश्मीर या महत्वाच्या राज्यांमध्ये बंडाळी माजल्यानं काँग्रेस हायकमांड चक्रावून गेलंय. एकीकडे लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी काँग्रेसला धडपड करावी लागतेय तर दुसरीकडे राज्या राज्यात बंडखोरी वाढतेय.
अनेक चढउतार पाहिलेल्या काँग्रेसला बंडाळी नवी नाही. पण सध्याची परिस्थिती बिकट आहे. काँग्रेस केंद्रात सत्तेबाहेर फेकली गेलीय. पुन्हा जनाधार मिळवून देणारं नेतृत्व सध्या काँग्रेसकडे नाही आणि राज्याराज्यात बंडखोरी होतेय. या संकटांमधून काँग्रेस कशी मार्ग काढते यावरच पक्षाचं भवितव्य ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.