'विरोधी पक्षाला राजीनामा मागण्याचा रोग'

काँग्रेसनं रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावलीय. एव्हढंच नाही तर या पद्धतीनं राजीनामे मागण्याचा रोगच विरोधी पक्षाला लागल्याचं काँग्रेसनं म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 4, 2013, 07:17 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
काँग्रेसनं रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावलीय. एव्हढंच नाही तर या पद्धतीनं राजीनामे मागण्याचा रोगच विरोधी पक्षाला लागल्याचं काँग्रेसनं म्हटलंय.
पक्षाचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी पत्रकारांशी आज संवाद साधला. यावेळी ‘जी मंडळी राजीनाम्याची मागणी करत आहेत त्या लोकांना हा रोगच लागलाय. बन्सल यांनी स्वत: लाचखोरी प्रकरणात स्पष्टीकरण दिलंय. याप्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात येईल, असंही आश्वासन त्यांनी पक्षाला दिलंय. आणि त्यांच्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षा करणं मला तरी योग्य वाटत नाही’ असं द्विवेदी यांचं म्हणणं आहे.
सरकारमध्ये एका उच्चपद मिळवून देण्यासाठी ९० लाखांची लाच घेताना रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या भाच्याला विजय सिंगला शुक्रवारी सीबीआयनं अटक केली होती. भाजपनं याप्रकरणात रेल्वेमंत्री यांना पदच्युत करण्याची मागणी केली होती तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी केली होती.

दरम्यान, पवनकुमार बन्सल यांनी आपल्या भाच्याशी आणि लाचखोर प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. आपला आणि भाच्याचा कोणताही व्यावसायिक संबंध नसल्याचं बन्सल यांचं म्हणणं आहे.