जम्मू-काश्मीरमधून कार चोरुन चार दहशतवादी फरार

श्रीनगरमधील एक कार हायजॅक झाल्यानं खळबळ माजली आहे. जम्मू-श्रीनगर हायवेवर ही कार हायजॅक झाली. या कारचा रजिस्ट्रेशन नंबर हा पंजाबमधला आहे. सध्या या कारचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु झालंय. या घटनेमुळं जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. 

IANS | Updated: Aug 13, 2014, 04:38 PM IST
 जम्मू-काश्मीरमधून कार चोरुन चार दहशतवादी फरार title=

श्रीनगर: श्रीनगरमधील एक कार हायजॅक झाल्यानं खळबळ माजली आहे. जम्मू-श्रीनगर हायवेवर ही कार हायजॅक झाली. या कारचा रजिस्ट्रेशन नंबर हा पंजाबमधला आहे. सध्या या कारचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु झालंय. या घटनेमुळं जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. 

श्रीनगरमधील रामवन भागातून मारुती स्विफ्ट टॅक्सी (गाडी क्र.: PB-35T4434) चोरुन त्या गाडीतून चार दहशतवादी फरार झाले आहेत. पळून गेलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टॅक्सीतून फरार झालेल्या दहशतवाद्यांपैकी दोघं पंजाबी भाषेत तर दोघं काश्मीरी भाषेत बोलत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबी भाषेत बोलणाऱ्या दोन तरुणांनी सात हजार रुपये देऊन ११ ऑगस्टच्या संध्याकाळी पाचच्या सुमारास पठाणकोट भागातून मारुती स्विफ्ट टॅक्सी भाड्यानं घेतली. स्वतःची पर्यटक अशी ओळख करुन देऊन पंजाबी बोलणाऱ्या दोन तरुणांनी टॅक्सी ड्रायव्हरशी पंजाबी आणि हिंदी भाषेत गप्पा मारल्या होत्या. वेगवेगळ्या रस्त्यांवरुन फिरल्यानंतर त्यांनी जम्मू बस स्टँडजवळ दोन मित्र वाट बघत असल्याचं सांगून टॅक्सी त्या दिशेनं नेण्यास सांगितलं.

ड्रायव्हर करमवीर सिंह यांनी टॅक्सी जम्मू बस स्टँड जवळ नेली. तिथं काश्मीरी भाषेत बोलणाऱ्या दोन तरुणांना घेऊन टॅक्सी पुढं श्रीनगरच्या दिशेनं निघाली. या प्रवासादरम्यान कुद इथं करमवीर आणि टॅक्सीत बसलेल्या चौघांनी एका हॉटेलमध्ये जेवण केलं. जेवण झाल्यानंतर ते सगळे पुढं निघाले. चंदरकोटे-रामवन दरम्यान करोल ब्रिजवरुन जात असताना एका तरुणानं उलटी येत असल्याचं सांगून गाडी थांबवण्यास सांगितलं. गाडी थांबताच उलटीची तक्रार करणारा तरुण आणि त्याचे मित्र टॅक्सीतून बाहेर आले. त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर करमवीर सिंह यांना बाहेर बोलावलं. करमवीर टॅक्सी बाहेर येताच चौघा तरुणांनी त्याच्यावर एकदम झडप घेतली आणि त्याचे हात-पाय स्वतःजवळ असलेल्या दोरखंडानं घट्ट बांधले. करमवीरच्या खिशातून मोबाइल, पैसे, ड्रायव्हिंग लायसन्स या वस्तू जप्त केल्यानंतर त्याला जवळच्या एका खांबाशी बांधून चौघं तरुण टॅक्सी घेऊन फरार झाले.

गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडीनं रात्रीच्या वेळी करमवीरला बांधलेल्या अवस्थेत बघितलं. जवानांनी करमवीरची तातडीनं सुटका केली आणि त्याची चौकशी केली. चौकशीतून मिळालेल्या माहितीआधारे पोलिसांनी फरार झालेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली आहे. फरार दहशतवादी स्वातंत्र्यदिनी किंवा त्याच्या काही तास आधी एखादा घातपात करण्याची शक्यता असल्यामुळं पोलिसांनी जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट दिला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.