www.24taas.com, झी मीडिया, देहरादून
उत्तराखंडच्या नैसर्गिक संकटात सापडलेल्या भाविकांच्या मदतीसाठी आणि त्यांना सुरक्षित राज्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं गोचरला कॅम्प सुरु केलाय. तर आजपासून जोशीमठला कॅम्प सुरू होणार आहे. ‘झी २४ तास’नं महाराष्ट्रातल्या भाविकांसाठी कॅम्प उभारण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला राज्यमंत्री सुरेश धस यांनी प्रतिसाद दिलाय.
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या राज्यातल्या जवळपास २२०० भाविकांना आपापल्या गावांमध्ये परत पाठवण्यात राज्य शासनाला यश आलंय. मात्र, बद्रीनाथमध्ये अजूनही चार हजार भाविक अडकले असून त्यात राज्यातले अजून ३०० ते ४०० पर्यटक अडकल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय. मुख्यमंत्री काल डेहराडूनच्या भेटीवर आले होते. त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्याशी चर्चा केली. भाविकांच्या बचावकार्यासाठी आवश्यक ती सर्व मदत उत्तराखंड सरकारला केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच खासदार राजू शेट्टी, चंद्रकांत खैरे आणि आमदार सुरेश जेथलिया यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.
दरम्यान, १५० भाविकांशी अजूनही संपर्क झाला नसून जिल्हाधिकाऱ्यांना तालुका स्तरावरुन माहिती घेण्याचे निर्देश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुंबई इथं उभारण्यात आलेलं नियंत्रण कक्ष प्रभावीपणे काम करत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. लवकरच राज्यातले सर्व भाविक उत्तराखंडमधून सुखरुप परततील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.