दहशतवादी हल्ल्यानंतरही पंतप्रधान-सोनिया काश्मीर दौऱ्यावर

पंतप्रधान मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीनगरमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले होते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 25, 2013, 10:31 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, काबूल
पंतप्रधान मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीनगरमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले होते. या हल्लानंतर दुसऱ्याच दिवशी मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी श्रीनगरच्या पूर्वनियोजित दौऱ्यावर जात आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीनगरमधली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. पंतप्रधान या दौऱ्यात पाक सिमेवर असलेल्या जिल्ह्यांसाठी विशेष पॅकेज घोषित करण्याची शक्यता आहे.

सोमवारी, हिजबुलच्या दोघा दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात आठ जवान शहीद तर १९ जवान जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. हल्लेखोर दहशतवादी काश्मिरी नागरिकांच्या वेशात आले होते. मोटारसायकलवरून ट्यूशनला जात असलेल्या दोन विद्यार्थ्यांकडून त्यांनी मोटारसायकल हिसकावून घेतली आणि ते हैदरपोराच्या दिशेने निघाले. `३५ , राष्ट्रीय रायफल्स` चा ताफा नॅशनल हायवेवरून बडगाम येथील बेसकॅम्पच्या दिशेने निघाला होता. हा ताफा दुपारी साडेचारच्या सुमारास श्रीनगर-बारामुल्ला हायवेवरील हॉस्पिटलजवळ आला असता हे दहशतवादी लष्कराच्या वाहनाजवळ पोहोचले. या दोघांना काही मदत हवी असेल म्हणून जवानांनी त्यांना थांबवले असता दहशतवाद्यांनी एके ४७ रायफलींतून लष्करी वाहनावर बेछूट गोळीबार केला. त्यानंतर ते दोघेही बर्झुलाच्या दिशेने निघाले. मात्र , पंतप्रधान दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बर्झुलाजवळ पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांनी कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने दहशतवाद्यांनी याठिकाणी बॉम्ब फेकून गोळीबार केला. यात सीआरपीएफचा अधिकारी आणि जम्मू-काश्मीर दलातील पोलिस जखमी झाले. या गोंधळाचा फायदा घेत ते दोघे कारने पळून गेले.

कश्मीरमधील गेल्या तीन दिवसांतील हा दुसरा मोठा हल्ला असून हिजबुलच्याच दहशतवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता. सोमवारच्या हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिदीनने स्वीकारली असली तरी सुरक्षा यंत्रणांचा संशय बंदी घालण्यात आलेल्या लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेवर आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.