नवी दिल्ली: महागाई आणि रेल्वे भाडेवाढीविरोधात विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरत गोंधळ घातल्यानं लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करावं लागलंय. महागाईच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधक करत होते.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी महागाईच्या मुद्द्यावर विरोधकांनी एकजूट दाखवत मोदी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेचं कामकाज सुरु होताच काँग्रेस, आम आदमी पार्टी, जनता दल संयुक्त, डावे पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी सुरु केली. यात अण्णा द्रमुक, बीजू जनता दलाच्या खासदारांनी सहभाग घेतला नव्हता. महागाईच्या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा करावी अशी मागणी विरोधक करत होते.
विरोधी पक्षाच्या खासदारांच्या गोंधळात प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली. विरोधकांच्या गोंधळामुळं लोकसभेचं कामकाज दोन वेळा स्थगित करावं लागलं. “अच्छे दिन आये हे, महंगाई लाये है” अशा घोषणा विरोधक देत होते. घोषणाबाजी करण्यासाठी समोर आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश होता.
दुपारी दोन वाजता पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली. मात्र विरोधकांनी गोंधळ सुरु ठेवल्यानं लोकसभा दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रथमच लोकसभा विरोधीपक्ष नेतेपदाच्या भूमिकेविषयी मौन सोडलं. लोकसभेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष आमचा असून या पदावर आमचाच हक्क आहे. हे पद न मिळाल्यास 'बघू' असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.