www.24taas.com, नवी दिल्ली
‘कोळसा खाण घोटाळा’ देशातील आत्तापर्यंत सर्वात मोठा घोटाळा असून या घोटाळ्यात युपीए सरकारचेच मंत्री अडकल्याचा आरोप भाजपनं आज एका पत्रकार परिषदेत केलाय.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं गोंधळातच सूप वाजलं. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं. पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचंही भाजपकडून सांगण्यात आलंय. ‘संसदेमधील गोंधळास पंतप्रधान स्वत:च जबाबदार आहेत. आम्ही केलेल्या दोन मागण्यांपैकी सरकारनं आमच्या दोन अटी अमान्य केल्यात. सरकारशी चर्चा करून काहीही निष्पण्ण होण्यासारखं नव्हतं’ असं म्हणत अधिवेशन सुरु राहावं यासाठी आम्ही प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत म्हणून भाजप भ्रष्टाचारावर आता संसदेबाहेर लढा देणार असल्याचं भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, संसदेचं पावसाळी अधिवेशन वाया गेल्याचं खापर सरकारनं विरोधकांवर फोडलंय. संसदेमध्ये गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणणं लोकशाहीविरोधी असल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलंय. कॅगविषयी आम्हाला आदर आहे, मात्र त्यांच्या अहवालावर वादविवाद व्हायलाच हवा, असंही ते म्हणाले.
अधिवेशनाचा शेवटचा दिवस
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं गोंधळातचं सूप वाजलं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही गोंधळाचं वातावरण कायम राहिलं. आजही कामकाज सुरू होताच पुन्हा गदारोळ झाला. संसदेचं कामकाज १३ दिवस ठप्प राहिलं. त्यामुळं जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झालाय. तसेच अनेक महत्त्वाची विधेयकही मंजूर होऊ शकलेली नाहीत. संपूर्ण अधिवेशनात कुठल्याही प्रकारचं कामकाज होऊ शकलेलं नाही. अधिवेशनाची समाप्ती झाल्यानंतर कोळसा गैरव्यवहाराच्या मुद्यावर जनजागृतीसाठी भाजपनं त्यांच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या सभांचा जम्बो कार्यक्रम आखलाय.