दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : राज्यातील सर्व मोठे रस्ते प्रकल्प जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवून भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरू केली आहे. यात प्रामुख्याने मुंबई-गोवा, पुणे-सातारा तसेच इतर राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील या प्रकल्पांचा बैठक घेऊन आढावा घेतला.
कामाच्या धडाक्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी जातीने राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. दर तीन महिन्यांनी ते राज्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतात. यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांना राज्यातील जनतेला रिझल्ट दाखवायचा आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्याआधी राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प पूर्ण करण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न आहे. राज्यात युपीएच्या काळात ५ हजार ७०० किमीचे रस्ते तयार झाले होते, तर भाजपा सरकारने जानेवारी २०१९ पर्यंत १९५०० किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचा संकल्प केला आहे. यासाठी 1 लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
या सर्व प्रकल्पांवर एक नजर टाकूया...
अनेक वर्ष रखडलेला
- मुंबई-गोवा महामार्ग जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करणार
- मुंबई- गोवा मार्गावरील पनवेल-इंदापूर टप्पा मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करणार
- मुंबई गोवा कोस्टल रोडही करणार
- कोस्टल रोडचा डीपीआर पूर्ण, ३१ मे पर्यंत निविदा काढणार
- पंढरपूरला देहू आणि आळंदीवरून जाणारे दोन्ही पालखी महामार्ग पूर्ण करणार
- पुणे-सातारा रस्त्याचे काम ८२ टक्के कामे पूर्ण झाले असून तेही लवकर पूर्ण होणार
- खंबाटकी घाट टाळण्यासाठी सातारला जातानाच्या मार्गावर आणखी एक बोगदा बांधणार
- रायगड किल्ला विकासासाठी ६५० कोटी
- त्यातील २६० कोटी महाड ते रायगड रस्त्यासाठी
लोकसभा निवडणुकीच्या आधी जानेवारी २०१९ मध्ये महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे काम पूर्ण करून त्याचे धुमधडाक्यात लोकार्पण करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे.
यात प्रामुख्याने
- मुंबई गोवा
- मुंबई गोवा कोस्टल रोड
- समृद्धी महामार्ग
- पुणे - सातारा महामार्ग
- पंढरपूरला जाणारे दोन्ही पालखी महामार्ग
हे रस्ते पूर्ण करून २०१९ च्या निवडणुकीत शतप्रतिशत भाजपाचा नारा देण्यासाठी भाजपा सज्ज होणार आहे.