भोपाळ : आयकर विभागानं भाजप नेता सुशील वासवानी याच्या घरावर तसंच विविध व्यावसायिक ऑफिसेसवर मंगळवारी सकाळी धाडी मारल्या.
आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, टीम्सनं सर्वात पहिल्यांदा भाजप नेत्याच्या भोपाळनजिकच्या बैरागडजवळच्या घरावर छापा मारला. यासोबतच त्याच्या अन्य परिसरांवरही छापे मारण्यात आले. यामध्ये वासवानी तसंच त्याच्या कुटुंबाकडून चालवल्या जाणाऱ्या हॉटेल आणि एका सहकारी बँकेचाही समावेश आहे. या भाजप नेत्यावर काळं धन सफेद करण्याचा आरोप आहे.
नोटाबंदीनंतर जुन्या नोटा बदलणं आणि नव्या नोटांचे काळे धेदे पकडण्यासाठी आयकर विभागाच्या विविध टीम्सनं हे छापे मारलेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. या प्रकरणाची विस्तृत माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
सुशील वासवानी महानगर सहकारिता बँकचा अध्यक्षही आहे. बँकेच्या माध्यमातून आपल्याकडील काळं धन मोठ्या प्रमाणात सफेद करण्याचा त्याच्यावर आरोप आहे. सुशील वासवानी भाजपचा मोठा नेता असल्याचं म्हटलं जातंय. त्यांची सून संगीता ही भाजपची नगरसेवकही आहे.