www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
`मिस्टर सायन्स ऑफ इंडिया` अशी ओळख असलेले ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. चिंतामणी नागेश रामचंद्र उर्फ सी. एन. आर. राव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय. सचिन तेंडुलकर यांच्यासह आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ राव यांच्याही नावाची घोषणा आज सरकारनं केली.
आपलं संपूर्ण आयुष्य विज्ञानाला वाहून घेतलेले सी. एन. आर. राव घन-स्थिती रसायनशास्त्र आणि संरचनात्मक रसायनशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. राव यांनी १९५१मध्ये म्हैसूर विद्यापीठातून पदवी मिळवली. नंतर त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर ते पीएच. डी. अभ्याक्रमासाठी अमेरिकेतील एड्रू विद्यापीठात प्रवेश घेतला. १९६३ ते १९७६ या काळात कानपूर आयआयटीमधील रसायनशास्त्र विभागात, तर १९८४ ते १९९४ या काळात बंगळुरूतील भारतीय विज्ञान संस्थेत अध्यापन केलं.
याआधी राव यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. राव यांनी पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे प्रमुख म्हणूनही काम पाहिलंय.चीन आणि भारत या देशांमधील वैज्ञानिक सहकार्य वाढीसाठी डॉ. राव यांचं मोठं योगदान आहे. सध्या ते बंगळुरूतील जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्रात संशोधक प्राध्यापक आणि मानद अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.