नवी दिल्ली : तब्बल ९० वर्षांपूर्वी ज्या पिस्तुलने भगतसिंग यांनी ब्रिटीश अधिकारी जॉन सँडर्सची गोळ्या घालून हत्या केली होती ते पिस्तुल अखेर सापडलेय.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार बीएसएफच्या इंदोरमधील म्युझियममध्ये ठेवण्यात आलेय. भगतसिंग यांचे 32 mm चे कोल्ट ऑटोमॅटिक पिस्तोल इंदोरस्थित बीएसएफ सेंट्रल स्कूल ऑफ वीपन्स अँड टॅक्टिक्स(सीडब्लूएसटी) मध्ये ठेवण्यात आलंय.
१७ डिसेंबर १९२८ रोजी भगतसिंग यांनी ब्रिटिश अधिकारी जॉन सँडर्सची गोळी घालून हत्या केली होती. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये शहीद भगतसिंग यांचे योगदान कोणीच विसरु शकत नाही. देशात आजही भगतसिंग यांचे नाव मोठ्या आदराने आणि सन्मानाने घेतले जाते. त्यामुळे त्याचे हे पिस्तुल पाहण्यासाठी म्युझियममध्ये लोकांची मोठी गर्दी होतेय.
सीएसडब्ल्यूटीचे संग्रहालयाचे विजेंद्र सिंह यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आम्ही पिस्तुलावरील काळा रंग हटवला तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. आम्ही त्या पिस्तुलवरील सीरियल नंबरवरुन ते कोणाचे पिस्तुल आहे याचा शोध घेतला. याबाबतच्या नोंदी शोधताना हे पिस्तुल भगतसिंग यांचे असल्याचे आढळले.