नवी दिल्ली : दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'बद्दल एक धक्कादायक खुलासा झालाय. यामुळे, नक्कीच भारतीयांना धक्का बसलाय.
ब्रिटनच्या एका चॅनलनं दिलेल्या माहितीनुसार, 'इस्लामिट स्टेट'चं (इसिस) सोशल वेबसाईट ट्विटर अकाऊंट एक भारतीय ऑपरेट करतोय. 'इसिस'च्या या भारतीय मित्राच्या खुलाशामुळे तपास यंत्रणांना जोरदार धक्का लागलाय.
ब्रिटनच्या 'चॅनल ४'नं केलेल्या दाव्यानुसार, इसिस समर्थक ट्विटर अकाऊंटवर हा खुलासा करण्यात आलाय. ट्विटरवर 'इसिस'चं अकाऊंट सांभाळणारा एक भारतीय व्यक्ती असल्याचा दावा करण्यात आलाय.
इसिसचं हे अकाउंट एक भारतीय व्यक्ती सांभाळतो. या व्यक्तीचं नाव मेहंदी असं आहे... तसंच मेहंदी हा बंगळुरूमध्ये एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करतो. तिथं तो एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतोय. मेहंदीला 'इसिस'मध्ये सहभागी व्हायचंय, असाही दावा यामध्ये करण्यात आलाय.
या खुलाशानंतर ट्विटरवर @shamiwitness हे अकाऊंट बंद करण्यात आलंय. हे अकाऊंटचे १७ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. महिन्याला २० लाख लोक या अकाऊंटला भेट देतात. याच ट्विटर हँडलवरून सीरियाच्या सैनिकांच्या हत्येचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता, असंही समजतंय.
भारतीय गुप्तचर यंत्रणेला या ट्विटर हँडलबद्दल माहिती आहे, असं म्हटलं जातंय. त्यामुळे, गुप्तचर यंत्रणेला 'मेहंदी' या नावाच्या व्यक्तीची ओळख पटलीय किंवा नाही हा प्रश्न मात्र उरतो. तसंच 'इसिस'मध्ये भरती होण्यासाठी मेहंदीनं भारतीय युवकांना संपर्क केलाय का? हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
'इसिस'बद्दलच्या या खुलाशाबद्दल बंगळुरू पोलिसांनी आपली या संपूर्ण प्रकरणावर नजर आहे तसंच आपण गुप्तचर यंत्रणेच्याही संपर्कात असल्याचं म्हटलंय. पोलीस आयबी आणि एनआयएच्या संपर्कात आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.