बंगळुरू: बंगळुरुमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजु यांनी म्हटलंय. या स्फोटामागे सिमीचा हात असण्याची शक्यताही रिजीजु यांनी वर्तवलीय. या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर देशभर अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती रिजीजु यांनी दिलीय.
बंगळुरू स्फोटात आयईडीचा वापर झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या स्फोटानंतर केंद्र सरकार कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केलीय.
रविवारी नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असलेल्या या हाय टेक सिटीमध्ये चर्च स्ट्रीट परिसरात स्फोट झाला आणि प्रचंड गोंधळ उडाला. कोकोनट ग्रोव्ह रेस्ट्राँजवळ झालेल्या या स्फोटात तामिळनाडूतल्या भवानी नामक महिलेचा मृत्यू झालाय. तिचे नातलग या स्फोटात जखमी झालेत. स्फोटातल्या जखमींवर मल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या स्फोटासाठी ऍल्युमिनियम पाईपचा वापर केल्याचा अंदाज बंगळूरू पोलिसांनी वर्तवलाय. घटनास्थळी टायमरमध्ये वापरली जाणारी एक बॅटरीही सापडलीये. खरंतर या स्फोटाबाबत बंगळुरू पोलिसांना इशारा होता. गुप्तचर विभागानं या स्फोटामागे सिमीचा हात असल्याची शक्यता वर्तवलीये. कर्नाटक सरकारबरोबरच केंद्र सरकारही या प्रकरणी लक्ष ठेवून आहे.
या स्फोटानंतर दिल्ली-मुंबईसह देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष करताना नागरिकांनीही सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलंय. मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी नाकेबंदी करुन वाहनांची कसून तपासणी करण्यात येतेय. तर दुसरीकडे सांस्कृतिक नगरी पुण्यातही सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.