www.24taas.com,नवी दिल्ली
ईशान्येकडील भारतीय नागरिकांच्या स्थलांतराच्या मुद्याचे आज संसदेतही प़डसाद उमटले. स्थलांतर रोखण्यासाठी सरकारनं ठोस कारवाई करण्याची मागणी सुषमा स्वराज यांनी केली. देशातल्या अनेक शहरांमध्ये शिकत असलेल्या विद्यर्थ्यांना सरकारनं सुरक्षेची हमी द्यावी तसंच त्यांच्यासाठी ठिकाठिकाणी हेल्पलाईनही सुरू करावी अशी मागणी स्वराज यांनी आपल्या भाषणात केली. तर सरकार आणि गृहमंत्री आहे का याबाबतच अफवा असल्याची खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलीय. सपाच्या रामगोपाल यादवांनी सोशल नेटवर्कींग साईटवर बंदी घालण्याची मागणी केलीय.
बल्क एसएमएसवर बंदी
देशभरात १५ दिवसांसाठी बल्क एसएमएसवर बंदी घालण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेत. याबरोबरच बल्क एमएमएसवरही बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती शिंदेंनी दिलीये. आसाम हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणाहून ईशान्य भारतीयांचे स्थलांतराचे लोंढे जाऊ लागलेत. हल्ल्याच्या अफवेने ईशान्य भारतीयांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आणखी अफवा पसरू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. तर राज्यसभेतही या मुद्यावर चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी ईशान्येकडील भारतीयांना सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन दिलं. तसंच हल्ल्याच्या अफवा पसरवणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही पंतप्रधानांनी दिले आहेत.
अफवांनंतर मनात दहशत
हल्ल्यांच्या अफवांनंतर ईशान्य भारतीयांच्या मनात अजूनही दहशत हे.. देशातील इतर भागांप्रमाणेच राज्यातून ईशान्य भारतीय परतीच्या वाटेला लागले आहेत.. मुंबई, पुणे, नाशिक या महानगरांसह इतर भागातूनही मोठ्या प्रमाणात ईशान्य भारतीय आसामकडे रवाना होतायेत.
रेल्वे स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी असून, मिळेत त्या रेल्वेने आसामकडे जाण्यासाठी ईशान्य भारतीयांची गर्दी झालीये.. केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरक्षेच्या हमीनंतरही हा परतीचा प्रवास सुरुच आहे.
विद्यार्थ्यांचे स्थलांतर सुरु
मुंबईत राहणा-या इशान्येकडील राज्यातल्या नागरिकांनी अफवांचा धसका घेतलाय़. मुंबईतूनही इशान्येकडील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी स्थलांतर सुरु केलयं. आज पहाटे मुंबईहून गुवाहटी आणि पश्चिम बंगालकडे जाणा-या गाड्यांना नागरिकांची तुफान गर्दी होती.
लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला आणि सीएसटी स्थानकात रात्रीपासून नागरिकांनी गर्दी केली होती. या गाड्य़ांमध्ये इशान्येतील नागरिक मिळेल तशी जागा पकडून जात होते. नागरिकांमध्ये असलेली भीतीचं वातावरण कायम आहे हे त्यांच्या देहबोलीवरुन तरी जाणवत होतं.
मुंबई आणि उपनगरातील कल्याण कसारा इगतपूरी स्टेशनवरही इशान्येतील नागरिकांची गर्दी असल्याचं दिसतयं.