www.24taas.com, नवी दिल्ली
स्वतःला संत म्हणवून घेणाऱ्या आसाराम बापूंनी मीडिया-सरकारचा उल्लेख ‘भुंकणारे कुत्रे’ असा केलाय. एव्हढंच नाही तर, देव आपला ‘यार’ आहे असं सांगणाऱ्या बापूंनी दुष्काळ पडलेल्या ठिकाणी आपण पाऊस पाडून चमत्कार घडवून आणू शकतो, असा दावाही केलाय.
धर्म आणि शास्त्रांनुसार, संतांची वाणी शुद्ध असते. परंतू आसाराम बापूंची गोष्ट काही औरच... ते जेव्हा जेव्हा तोंड उघडतात तेव्हा त्यामध्ये कुणालातरी शिव्यांची लाखोली वाहिलेलीच असते. नुकतंच, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरा असं सर्वजण आवाहन करत असताना बापूंनी मात्र महाराष्ट्रात दोन ठिकाणी धुळवड साजरी केली. त्यांच्यावर टीका करणाऱ्या मीडियाला आणि सरकारी यंत्रणेला ‘कुत्री भुंकतातच, आम्ही कोणाच्या बापाचं पाणी घेत नाही’ अशा शब्दांत त्यांनी प्रत्यूत्तर दिलं. तसंच गैरसरकारी संघटनांनवरही तोफा डागल्या. बापूंची ही प्रतिक्रीया आणि महाराष्ट्र राज्य सरकारला दिलेला सल्ला संबंध जनतेनं प्रसारमाध्यमांद्वारे पाहिला.
‘मी चांगली कामं करतोय आणि लोकं उगाचाच माझावर टिकास्त्र सोडतात... देव माझ्यासोबत आहे... मला चमत्कार करता येतो त्यामुळे जिथे दुष्काळ आहे तिथं मी दैवी चमत्कार घडवून पाऊसही पाडू शकतो’ असं बापूंनी म्हटलंय. याच वेळी लोकांच्या आस्थेची टर उडवत बापूंनी देवाला आपला ‘यार’ असं संबोधलंय. काही दिवस या पापी जगापासून दूर एकांतवासात जाण्याचीही इच्छा त्यांनी व्यक्त केलीय.