दिल्ली गँगरेप : आरोपीला हवाईदलाचा इंटरव्ह्यू कॉल

दिल्लीत डिसेंबर महिन्यात तरुणीवर चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला भारतीय वायुसेनेमध्ये भरती होण्यासाठी इंटरव्ह्यू कॉल आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 28, 2013, 07:50 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
एखादी व्यक्ती आपल्या पायावर कसा धोंडा मारून घेऊ शकतो, याचं हे उत्तम उदाहरणच आहे. दिल्लीत डिसेंबर महिन्यात तरुणीवर चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला भारतीय वायुसेनेमध्ये भरती होण्यासाठी इंटरव्ह्यू कॉल आलाय.
दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याला भारतीय हवाईदलात ‘वर्ग सी’मध्ये भरती होण्यासाठी इंटरव्ह्यू कॉल आलाय. विनयची एलडीसी वर्ग सीच्या लिखित परीक्षेत निवड झाली आहे आणि यानंतर होणाऱ्या मुलाखतीसाठी विनयला बोलावण्यात आलंय. आरोपीच्या वकिलांनी ही माहिती दिलीय. सोबतच विनयसाठी एखादा ट्यूटर नियुक्त करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय. जलदगती न्यायालयासमोर विनयनं यासाठी अर्जही केलाय.
‘भारतीय वायुदलात भरती होण्यसाठी सामान्य ज्ञान परीक्षाही घेतली जाते. या परिक्षेच्या तयारीसाठी त्याला ट्यूटर नियुक्त केला जावा. त्यामुळे विनयला नोकरी मिळण्यास मदत होईल, कमाईही चांगली मिळेल आणि तो एक चांगलं जीवन जगू शकेल. तो परिवारातील एकुकता एक कमावती व्यक्ती आहे’ अशी विनवणी विनयच्या वकिलांनी केलीय.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश खन्ना यांनी पोलिसांना या अर्जावर त्यांची टीपण्णी सोपवण्यास सांगितलंय. या अर्जावर २८ एप्रिल रोजी सुनावणी होईल.