www.24taas.com, नवी दिल्ली
‘अण्णांवर एक नाही तर हजारो आयुष्य ओवाळून टाकेन’ असं म्हणत अरविंद केजरीवाल स्वामी अग्निवेश यांच्या आरोपांचं खंडन केलंय. उपोषणादरम्यान अण्णा हजारेंचा मृत्यू व्हावा, जेणेकरून त्याचा फायदा आंदोलनाला मिळू शकेल... अशीच अरविंद केजरीवाल यांची इच्छा होती, असा आरोप एका न्यूज चॅनलशी बोलताना स्वामी अग्निवेश यांनी नुकताच केला होता.
स्वामी अग्निवेश यांना केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलंय. केजरीवाल ट्विटरवर म्हणतात, ‘अण्णांवर एक नाही तर हजारो आयुष्य ओवाळून टाकले गेले तरी ते कमीच...’ स्वामी अग्निवेश यांनी कोणत्या आधारावर आपल्यावर अण्णांचा जीव घेण्याच्या गोष्टी केल्याचा आरोप केला ते स्पष्ट करावं, असं म्हणत त्यांनी अग्निवेश यांच्यावर हल्ला चढवलाय.
अग्निवेश यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल २०११ मध्ये जेव्हा जंतर-मंतरवर जन लोकपाल आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी स्वत: अण्णांना उपोषणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. ‘पण, नंतर अण्णा आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत असं समजल्यानंतर मी केजरीवाल यांना प्रश्न केला की, अण्णांसारखा वयोवृद्ध व्यक्ती उपोषणाला का बसतोय? यावर अरविंद केजरीवाल यांचं उत्तर होतं की, जर या उपोषणात अण्णांचं बलिदान गेलं तर त्यामुळे क्रांती होईल. या आंदोलनात त्यांचा प्राण गेला तरी हरकत नाही, आंदोलनासाठी ती चांगलीच गोष्ट ठरेल’.