अहमदाबाद : प्रेमाला कसलंही बंधन नसतं असं म्हटलं जातं. त्याचाच प्रत्यय नुकताच अहमदाबादमध्ये आला. इथल्या एका झोपडीत राहणाऱ्या गरीब तरुणाचा विवाह एका श्रीमंत अमेरिकन महिलेशी झालाय. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.
अहमदाबादमध्ये राहणाऱ्या हितेश चावडाची ओळख टॅमीशी झाली. ऑनलाईन चॅटिंगच्या माध्यमातून ते एकमेकांना भेटले. हितेशला धड इंग्रजीही येत नाही. तो फक्त बारावी पास आहे. तरीही दोघं एकमेकांशी गप्पा मारायचे. हितेशचं वय २३ वर्ष आहे तर टॅमीचं वय ४१ वर्ष... दोघंही एकमेकांशी चॅटिंग करायचे. एक वर्षभर चॅटिंग करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
हितेशने आपण गरीब आणि अनाथ आहे. तसेच झोपडपट्टीत राहतो, असे त्याने टॅमीला सांगितलं. पण, टॅमीचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. त्याने टॅमीला स्वतःचे फोटो दाखवले. त्याचा प्रामाणिकपणा पाहून ती त्याच्यावर भाळली. तिने हितेशला अमेरिकेला बोलावलं. पण, परिस्थिती नसल्याने आणि पासपोर्ट नसल्याने तो अमेरिकेला जाऊ शकला नाही. शेवटी टॅमीने भारतात येण्याचा निर्णय घेतला. भारतात येऊन तिने हितेशशी विवाह केला आणि ती चक्क एका झोपडीतच संसार धाडला. तिने प्रेमापोटी त्याच्या गरीबीशी जुळवून घेतले.
'हितेशकडे पैसा नाही. पण, पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही. माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो. तेच सर्वात महत्त्वाचं आहे. लोक म्हणतात हितेशला इंग्रजी येत नाही. पण, माझ्या मते त्याला उत्तम इंग्रजी येतं. कारण, आम्ही काय बोलतो ते एकमेकांना चांगलं समजतं,' असं टॅमी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाली.
चोटीलाच्या देवळात त्यांचा विवाह झाला. आता त्यांनी कायदेशीर लग्नाच्या प्रक्रियेस प्रारंभ केला आहे. काही काळासाठी हितेश आणि टॅमी अमेरिकेला जाणार आहेत. पण, टॅमीची भारतात राहण्याची इच्छा असल्याने ते भारतातच परत येणार आहेत. सध्या भारतीय पद्धतीच्या चपात्या तयार करण्याचं ती शिक्षण घेतेय. पण, या 'फॉरेनच्या पाटलीण'ची सध्या हितेशच्या शेजाऱ्यांमध्ये भरपूर चर्चा आहे.