नवी दिल्ली : मोदी सरकारमधल्या मंत्र्यांना आणि त्यांच्या टीमला आता आपली शक्कल लढवावी लागणार आहे. कारण, पंतप्रधान मोदींचेच तसे आदेश दिलेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सगळ्याच मंत्र्यांना काहीतरी हटके आणि नवी आयडिया शोधून काढण्यास फर्मावलंय. १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत ते या आयडियांचा धांडोळा घेणार आहेत.
या आयडिया मंत्र्यांच्या मंत्रालयाशी आणि बजेटशी सुसंगत असायला हव्यात. सर्वात उत्तम आयडिया लगेचच अंमलात आणल्या जाऊ शकतील.
पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याला सगळ्याच मंत्र्यांसोबत एक बैठक घेतात. आत्तापर्यंत अशा सहा बैठका पार पडल्यात. १३ ऑक्टोबर रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखेची घोषणा होणार आहे. यासाठी सरकारनं संसदीय समितीची बैठकही बोलावलीय. यंदाचं हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.