www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोन्याला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला तरी झळाळी मिळेल, असं सराफांना वाटत होतं, पण ही अपेक्षा साफ फोल ठरली आहे.
सामान्य ग्राहकांचा शुक्रवारी खरेदीत अनुत्साह दिसून आला. परिणामी मुंबईच्या सराफ बाजारात सोन्याच्या भावात १३० रुपयांनी उतार येऊन तो २९,८०० वर बंद झाला.
अनेक सराफांकडून ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या योजना जाहीर करण्यात आल्या, तरी पारंपरिकदृष्टय़ा हा मुहूर्त साधून होणाऱ्या खरेदीपेक्षा यंदाची खरेदी तुलनेने खूपच कमी राहिल्याची कबुली अनेक सराफांनी नामोल्लेख न करण्याच्या अटीवर दिली.
शहराच्या सराफ बाजारात चांदीचा भावही किलोमागे २२० रुपयांनी घटून ४२,६२० रुपयांवर उतरला. परंपरेने सर्वाधिक मागणी मिळणाऱ्या दिवशी मौल्यवान धातूंचे भाव घसरण्याचे प्रसंग अभूतपूर्वच असल्याचे सराफांचे म्हणणे आहे.
गेल्या काही दिवसांत सार्वत्रिक निवडणुकांच्या वातावरणापायी मोठय़ा रोखीच्या व्यवहारांवर यंत्रणेचा कटाक्ष असल्याने सोन्याची मागणी घटली होती. म्हणून राज्यातील निवडणुका उरकल्यावर, अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून खरेदी होईल, असा सुवर्ण व्यापाऱ्यांचा कयास होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.