नवी दिल्ली : विमा काढलेल्या सर्वांसाठी एक महत्वाची बातमी. डास चावला आणि त्यातून होणाऱ्या रोगामुळे मृत्यू ओढवला, तर तो अपघात म्हणून गणला जावा असा निर्णय राष्ट्रीय ग्राहक लवादानं दिलाय.
सर्प दंश किंवा कुत्रा चावणे हे विमा कंपन्यांच्या लेखी अपघात आहेत, मग डास चावणे हा सुद्धा अपघात म्हणूनच गणला गेला पाहिजे असं निकाल देताना राष्ट्रीय ग्राहक लवादानं स्पष्ट केलय. त्यामुळे जीवन विमा काढालेल्या कुणाचाही जर डास चावून होणाऱ्या रोगामुळे मृत्यू झाला, तर विमा कंपन्यांना त्याचा दावा फेटाळता येणार नाही.
कोलकात्याच्या मोशमी भट्टाचार्जी 2012मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आलाय. दरम्यान, भट्टाचार्जी यांनी केलेल्या याचिकेवर तालुका, जिल्हा, राज्य आणि केंद्र अशा सर्वच ठिकाणी डास चावणे आणि त्यातून मृत्यू होणे हा अपघातच मानला जावा असा निर्णय आल्यानं आता विमा कंपन्या आपल्या अटींमध्ये बदल करतील असा अंदाज आहे.