www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय लष्कर आज ६५ वा वर्धापन दिन साजरा करतंय. राजधानी दिल्लीत यानिमित्त एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला. लष्करप्रमुख विक्रम सिंग यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत हा सोहळा रंगला.
सध्या पाकिस्तान सीमेवर असलेल्या तणावपूर्ण वातावरणाबाबत भाष्य करताना, आम्ही कुठल्याही कठीण परिस्थितीचा मुकाबला करण्यास तयार असल्याचा पुनरुच्चार विक्रम सिंग यांनी यावेळी केलाय. आधुनिक शस्त्रांसह भारतीय सैन्य सज्ज करण्यावर यापुढे अधिक भर देणार असल्याचंही लष्करप्रमुखांनी सांगितलं.
भारतीय सैन्याची ताकद दाखविण्यासाठी दरवर्षी १५ जानेवारीला लष्कर दिन साजरा केला जातो. या खास कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांचा विरता पुरस्कार देऊन खास गौरव करण्यात आला तर पाकच्या भ्याड आणि क्रूर हल्ल्यात शहीद झालेल्या दोन जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी जवानांनी लष्करप्रमुखांना सलामी दिली. या शानदार कार्यक्रमात लष्करी अधिकारी आणि जवानांच्या कुटुंबीयांसह इतरही अनेक भागातील नागरिकांनी हजेरी लावली.