श्रीनगर : हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर बुरहान वाणी चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे. अनंतनाग जिल्ह्यात संतप्त निदर्शकांनी पोलिसांची मोबाईल बंकर व्हॅन झेलम नदीत ढकलून दिली. त्यामध्ये व्हॅनचा ड्रायव्हर असलेला पोलीस शहीद झाला. फिरोज अहमद असं या शहीद पोलिसाचं नाव आहे. या हिंसाचारामध्ये आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी जमावानं पोलीस चौकीवर केलेल्या हल्ल्यापासून बेपत्ता असलेल्या तिघा पोलिसांचा अद्याप शोध लागलेला नाही. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात दहशतवाद्यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलच्या पायांवर गोळ्या झाडून त्याला जखमी केलं. काश्मीरमध्ये शुक्रवारपासून झालेल्या दगडफेकीत आतापर्यंत 100 हून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान जखमी झाल्याचं समजतंय.