www.24taas.com,नवी दिल्ली
केंद्र सरकारमध्ये असलेले एस.एम.कृष्णा यांनी आपल्या परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. रविवारी होणा-या मंत्रीमंडळाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधी त्यांनी हा राजीनामा दिल्याने चर्चेला ऊत आला आहे. त्यांच्यावर कर्नाटकची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
एस.एम.कृष्णा यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. कृष्णा शुक्रवारी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासोबत लाओसला जाणार होते. पण त्यांनी हा दौरासुद्धा रद्द केला आहे. दरम्यान, रविवारी होणा-या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर एस.एम.कृष्णा राजीनामा दिल्याने आता परराष्ट्रमंत्रीपदाचा नवा दावेदार कोण याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
म्हैसूर बंगळूरु एक्सप्रेस हायवेवीरील जमीन अधिगृहण प्रकरणी कर्नाटक लोकायुक्त न्यायालयाने एस.एम.कृष्णा यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षातर्फे कर्नाटकच्या राजकारणात कृष्णा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याच्यावर कर्नाटकमधील पक्षाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.