जागतिक हृदय दिवस: हृदयासाठी घातक ठरणाऱ्या 7 सवयी!

दररोजची धावपळ, अनिश्चित आहार, व्यायामाचा अभाव अशा अनेक समस्यांना आपण सामोरं जात असतो. मात्र यासर्वांचा परिणाम आपल्या हृदयावर होत असतो. आज जागतिक हृदय दिवसानिमित्त जाणून घ्या अशा 7 सवयी ज्या आपल्या हृदयासाठी घातक ठरू शकतात.

Updated: Sep 29, 2015, 12:00 PM IST
जागतिक हृदय दिवस: हृदयासाठी घातक ठरणाऱ्या 7 सवयी! title=

मुंबई: दररोजची धावपळ, अनिश्चित आहार, व्यायामाचा अभाव अशा अनेक समस्यांना आपण सामोरं जात असतो. मात्र यासर्वांचा परिणाम आपल्या हृदयावर होत असतो. आज जागतिक हृदय दिवसानिमित्त जाणून घ्या अशा 7 सवयी ज्या आपल्या हृदयासाठी घातक ठरू शकतात.

आणखी वाचा - ताण - तणाव दूर करण्यासाठी मदत करणाऱ्या सात गोष्टी...

1. खूप वेळ एकाच ठिकाणी बसून राहणं - अनेकांना कंप्युटरसमोर तासनतास बसून काम करण्याची सवय असते. मात्र खूप वेळ एकाच ठिकाणी बसून राहणं हे हृदयासाठी घातक ठरू शकतं. पाच तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी बसून राहणं हृदयासाठी घातक असल्याचं एका रिसर्चमध्ये समोर आलंय. दर तासाला आपण जागेवरून उठून चालायला हवं. त्यामुळं हृदयाच्या कोशिकांमध्ये रक्तप्रवाहांना गती मिळते.

2. अती मद्यपान करणं - पार्टी करणं, मद्यपान करणं हे एक स्टेटस बनलंय. जर तुम्ही खूप मद्यपान करत असाल तर ते तुमच्या हृदयासाठी घातक ठरू शकतं. पुरुषांचं दिवसातून दोन ग्लास मद्य पिणं आणि महिलांनी दिवसातून एक ग्लास पिल्यानं हृदयाचा ताल बिघडतो. त्यामुळं तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होतो. त्याचाच परिणाम म्हणजे हार्ट फेल्युअर... एवढंच नव्हे तर मधूमेह, लठ्ठपणा वाढतो. 

3. पटकन रागाविण्याची प्रवृत्ती - जर तुम्ही तापट असाल लगेच रागवत असाल. तर जरा सावध राहा... त्यामुळं तुमच्या हृदयावर प्रेशर येऊ शकतं. महिला आणि पुरुष ज्यांना आपला राग सांभाळता येत नाही त्यांच्यातील हार्ट फेल्युअरचं प्रमाण अधिक वाढतं. 

कारण रागवल्यानं ब्लड प्रेशर वाढतं. त्याचाच परिणाम म्हणजे हृदयाला त्रास... यापासून वाचण्यासाठी आपल्याला राग आल्यास लांब श्वास घेत शांत राहण्याचा प्रयत्न करावा. 

4. उपहासात्मक वृत्ती - पाण्यानं अर्धा भरलेला ग्लास अनेकांना अर्धा रिकामाच दिसतो? जर तुम्ही आपल्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीनं बघत नसाल आणि नकारात्मकच विचार करत असाल तर त्यामुळं तुम्हाला हृदयाचा त्रास होणं सुरू होऊ शकतो. 

2009मध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार उपाहासवृत्ती आणि शत्रुत्व केवळ हृदयाच्या आजारांना आमंत्रण देत नाही तर मधूमेह, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल वाढ आणि नैराश्य वाढीसही कारणीभूत ठरतं.

5. खूप कमी झोपणं - जर तुम्ही तुमच्या शरीराला आराम देत नसाल, खूप कमी वेळ झोपत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर होतो. नैराश्य, ताणासारखे आजारही आपल्याला होतात.
त्यामुळं प्रौढांनी आठ तास तर लहानांनी 10 तास झोप घेणं आवश्यक आहे.

6. दातांची स्वच्छता न राखणं- हो दातांचं आरोग्य आणि आपल्या हृदयाच्या आरोग्याचा सरळ-सरळ संबंध आहे. दातांवर अॅटॅक करणारे बॅक्टेरिया रक्ताच्या सहाय्यानं हृदयापर्यंत पोहोचू शकतात आणि हृदयाच्या धमन्या अरुंद करतात. त्यामुळं हृदयाच्या आजारांना निमंत्रण मिळतं. एका रिसर्चनुसार 38 टक्के लोकांना दातांचे प्रॉब्लेम आहेत. 

7. डॉक्टरांकडे न जाणं - प्रत्येकानं रेग्युलर हेल्थ चेक अप करून घेणं आवश्यक आहे. आपल्याला आजारांची लक्षणं नेहमी दिसत असतात पण त्याकडे दुर्लक्ष करू नये. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा - अॅसिडीटीची कारणं आणि लक्षणं

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.