मुंबई : आपल्या कुटुंबात बहुतेक वेळी महिलांचं बचतीवर जास्त लक्ष असतं, हे आणखी एकदा निष्कर्षातून समोर आलं आहे.
देशातील नोकरी करणाऱ्या महिलांना निवृत्तीनंतरच्या जीवनाची चिंता भासते. विशेषतः निवृत्तीनंतरच्या शिलकीची चिंता या नोकरदार महिलांना पुरुषांपेक्षा अधिक भासते, असा निष्कर्ष एचएसबीसी काढला आहे.
एचएसबीसी अर्थात हॉंगकॉंग अँड शांघाय बॅंकिंग कॉर्पोरेशन लिमिटेडने केलेल्या पाहणीवरून महिलांना पुरूषांपेक्षा बचतीची अधिक चिंता असल्याचं स्पष्ट होतंय.
'एचएसबीसी'च्या पाहणीतील निष्कर्ष
या पाहणीसाठी जगभरातील १५ देशांतील सुमारे १६ हजार नोकरदारांशी संपर्क साधण्यात आला होता. यामध्ये एक हजार महिला भारतातील होत्या. ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१४ या दोन महिन्यांत ऑनलाइन मतदान पद्धतीने 'एचएसबीसी'ने 'इप्सॉस मोरी' या संस्थेच्या साह्याने हे सर्वेक्षण केले.
देशातील एक हजार नोकरदार महिलांपैकी ७५ टक्के महिलांनी निवृत्तीनंतर दैनंदिन खर्चासाठी स्वतःजवळ पुरेसे पैसे असतील का, याबाबत चिंता व्यक्त केली. विशेषतः सध्याची किंवा नोकरीच्या काळातील जीवनशैली निवृत्तीनंतरही आपल्याला राखता येईल का, याविषयीची चिंता या महिलांनी व्यक्त केली.
पैसे कसे साठवावेत किंवा आर्थिक बचत कशी करावी याची कल्पना देशातील बहुतांश महिलांना आहे. निवृत्तीनंतर पैशाचे यशस्वी व्यवस्थापन नेमके कसे करावे, याची पुरेशी कल्पना नसल्याचे किंवा याबद्दल मनात गोंधळ असल्याचे २२ टक्के महिलांनी मान्य केले. हीच स्थिती ३२ टक्के पुरुषांची आहे, असे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.