www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कधी नव्हे तो मुंबईतही हिवाळा जाणवू लागलाय. अनेकांनी आपल्या ठेवणीतले स्वेटर, शाली, मफलर, कानटोप्या किंवा मोठ-मोठाले स्कार्फ बाहेर काढलेत. या दिवसांत तुम्हाला सतत तुमच्या त्वचेची काळजी सतावत राहते... होय, ना?
आपल्या सगळ्यांना ‘फ्रेश’ लूक हवा असतो... मग तो कोणताही सिझन का असेना! पण, थँक्स म्हणा आपल्या धावपळीच्या जीवनाला, खाण्या-पिण्याच्या वाईट सवयींना, प्रदूषणाला आणि आपल्या स्वत:च्या निष्काळजीपणाला... ज्यामुळे आपण आपल्यालाही फ्रेश दिसत नाही... मग, इतरांना आपण फ्रेश कसे दिसणार? नाही का? कोणत्या वयातील स्त्रीला आपली त्वचा सुंदर आणि उजळ असावी, असंच वाटतं... पण, यासाठी पार्लरमध्ये जाऊन खूप महागड्या ट्रिटमेंट किंवा माइश्चरायजरवर भरमसाठ खर्च करण्याची गरज नाही, कारण तुम्ही घरच्या घरीही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता... तेही ‘नॅचरल माइश्चरायर्स’च्या साहाय्यानं... पाहुयात, कोणकोणती आहेत ही ‘नॅचरल माइश्चरायर्स’...
मध : मधामुळे तुमची त्वचा सॉफ्ट तर होतेच पण, त्वचेच्या उजळपणासाठी मध खूप उपयोगी ठरतो. चेहऱ्यावरचं पुरळ किंवा पिंपल्स घालवण्यासाठीही मध उपयोगी ठरतो.
कोरफड : तुमची त्वचा कोरडी पडली असल्यास कोरफडीचा गर किंवा रस तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. ‘स्कीन सेल’ पूर्ववत करण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमची त्वचा नेहमी मुलायम आणि तजेलदार दिसते.
ऑलिव्ह ऑईल थंडीमध्ये कोरड्या आणि रखरखीत त्वचेला मुलायम बनविण्यासाठी ऑलिव्ह ऑईल अत्यंत फायदेशीर ठरते. यातील ‘लिनोलिक अॅसिड’मुळे त्वचेचा ओलावा कायम राहतो.
गुलाबपाणी चेहऱ्यावर किंवा त्वचेवर गुलाबपाण्याचा वापर तुम्हाला बरंच काही देऊन जातो. चेहऱ्यारील ब्लॅकहेडस्, रखरखीत त्वचा, तेलकटपणा काढून त्वचा उजळ करण्यासाठी गुलाबपाणी खूप महत्त्वाचं ठरतं.
अॅव्हेकॅडो : त्वचेला ‘ई’ सत्व पुरविण्यासाठी अॅव्हेकॅडो अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे त्वचा तजेलदार आणि कोमल राहण्यास मदत होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.