www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शाकाहारींनाही खाता येईल अशा ‘वनस्पतीजन्य अंड्याची’ निर्मिती करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. त्यामुळे यापुढे शाकाहारी किंवा वार पाळणार्यांना रोजच अंडे खाता येणार आहे. अंड्यातील गुणधर्म असलेले हे शाकाहारी अंडे शोधण्यात विज्ञानाला यश आले आहे.
अंड्यात प्रथिनं आणि पोषणमूल्य भरपूर असल्यामुळे डॉक्टर नेहमी अंडी खाण्याचा सल्ला देतात. मात्र एक जीव मारायचा या तत्त्वापायी शाकाहारी लोक अंडी खात नाहीत. अनेकांना अंड्याचा वास आणि चव आवडत नाही. परंतु, अमेरिकेतील ‘हॅम्प्टन क्रीक फूड्स’ या कंपनीने अंड्याला पर्याय ठरू शकेल अशा उत्तम चवीच्या ‘शाकाहारी अंड्याचा’ शोध लावला आहे. आतापर्यंत अनेकदा शास्त्रज्ञांनी मांस आणि अंड्याला पर्याय शोधण्याचे प्रयत्न केले. परंतु, या कंपनीने अंड्याच्या गुणधर्माशी साधर्म्य असलेले अंडे तयार करण्यात यश मिळवले आहे.
निसर्गात असलेल्या फक्त ८ प्रकारच्या जाती अंड्याला किंवा मांसाहाराला पर्याय ठरू शकतील, असे अन्नघटक देत असल्याचे आढळून आले असल्याचे ‘हॅम्प्टन क्रीक फूड्स’चे कार्यकारी अधिकारी जोश टेट्रिक यांनी ‘लाईव्ह सायन्स’ या जर्नलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.