पुणे : पुण्याच्या गॅलेक्सी हॉस्पीटलनं एक इतिहास रचलाय. भारतात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झालीय.
एका आईचं गर्भाशय तिच्या २१ वर्षीय मुलीच्या उदरात प्रत्यारोपण करून डॉक्टरांनी ही किमया साधलीय. डॉक्टरांच्या टीमने जवळपास नऊ तास ही शस्त्रक्रिया केलीय. आई आणि मुलगी दोघी सुखरुप असल्याची माहिती डॉक्टर संजीव जाधव यांनी दिलीय. ज्या मुलीच्या शरीरात हे गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आलंय तिच्यावर पुढचे २४ तास डॉक्टरांची नजर असणार आहे.
पुण्याच्या गॅलेक्सी केअर लेप्रोस्कोपी इन्टिट्युट (GCLI) च्या १२ डॉक्टरांनी मिळून ही शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवलीय. मूळची सोलापूरची असलेली २१ वर्षीय तरुणी आई बनण्यास असमर्थ होती. तिच्या शरीरात गर्भाशय नव्हतं.
यानंतर, या हॉस्पीटलमध्ये २४ वर्षांच्या बडोद्याच्या एका महिलेवरही अशीच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तिलाही तिच्या आईचं गर्भाशय ट्रान्सप्लान्ट करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेत बाळाला कोणतीही हानी पोहचत नाही. ही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर आयव्हीएफच्या माध्यमातून ही स्त्री मुलांना जन्म देऊ शकते. परंतु, तिची डिलिव्हरी नॉर्मल नाही तर सिझेरियन होईल.
या दोन्ही शस्त्रक्रिया हॉस्पीटल मोफत करणार आहे. परंतु, यानंतर मात्र शुल्क आकारलं जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी ७-८ लाखांचा खर्च येऊ शकतो. महाराष्ट्र सरकारच्या मंजुरीनंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आलीय.
भारतात अशा प्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच होत असली तर स्वीडनमध्ये मात्र २०१२ साली असाच यशस्वी प्रयोग करण्यात आला होता.