www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अलिकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, ज्या स्थूल व्यक्तींमध्ये ‘ड’ जीवनसत्वाचे प्रमाण कमी असते त्यांना मधुमेह होण्याचा धोका अधिक प्रमाणात संभवतो. स्थूलपणामुळे मधुमेहाची शक्यता वाढते ही बाब तर सर्वज्ञातच आहे. त्याचबरोबर ‘ड’ जीवनसत्वाचे अपुरे प्रमाणदेखील मधुमेह होण्यास कारणीभूत ठरू शकते. तसंच या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास इन्सुलिनचे प्रमाण असंतुलित करणाऱ्या या आजाराची शक्यता अधिक बळावते, असे या नवीन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
‘डायबेटिस केअर’ या नियतकालिकामध्ये या अभ्यासातून प्राप्त झालेले निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहे. इन्सुलिनचे असंतुलन हे मधुमेहाची पूर्वसूचना देणारे महत्वाचे लक्षण आहे. या अभ्यासाकरिता वैज्ञानिकांनी जवळपास ६००० व्यक्तींच्या प्रकृतीविषयक माहितीचा अभ्यास केला.
त्यामध्ये असे आढळले की, ज्या व्यक्ती स्थूल आहेत मात्र त्यांच्या शरीरामध्ये ‘ड’ जीवनसत्वाचे प्रमाण उत्तम आहे त्यांच्यात सर्वसाधारण प्रकृतीच्या व्यक्तींच्या तुलनेत इन्सुलिन असंतुलनाची शक्यता वीस पटीने अधिक होती. मात्र, स्थूलपणा आणि ‘ड’ जीवनसत्वाचे अपुरे प्रमाण ही दोन्ही लक्षणे असलेल्या व्यक्तींमध्ये हीच शक्यता ३२ पटींनी अधिक असल्याचे दिसून आले. पेनिसिल्व्हानिया येथील ड्रेक्सेल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी याबाबत माहिती देताना सांगितले की ड जीवनसत्वाचे अपुरे प्रमाण आणि स्थूलपणा ही इंशुलिनचे असंतुलन आणि मधुमेह या दोन्ही समस्यांची स्वतंत्र कारणे आहेत. मात्र आम्ही केलेल्या अभ्यासातून प्राप्त झालेल्या निष्कर्षांनुसार हे दोन घटक स्वतंत्रपणे इंशुलिनच्या असमतोलास ज्या प्रमाणात कारणीभूत ठरू शकतात त्यापेक्षा या दोन घटकांच्या एकत्र येण्याने ही शक्यता कितीतरी अधिक प्रमाणात वाढू शकते.
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते जर या अभ्यासाचे निष्कर्ष स्वीकारण्यायोग्य असतील तर मधुमेहाचे बहुतांश रूग्ण हे औषधांबरोबर किंवा औषधांशिवाय केवळ ‘ड’ जीवनसत्वाचे वार्षिक इंजेक्शन घेऊन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवू शकतील. दूध आणि सूर्यप्रकाश यांमधूनही ड जीवनसत्व मिळवता येते.
स्थूल व्यक्तींमध्ये इंशुलिनचे असंतुलन आणि मधुमेहाची शक्यता कमी होण्यासाठी पूरक औषधे उपयोगी ठरतील की नाही हे निश्चित करण्याकरिता याविषयी अजून संशोधन करण्याची गरज आहे असेही वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.