www.24tas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या काही दिवसांत कडक उन्हाचा पारा खाली आला असला तरी अद्याप उन्हाच्या झळा कमी झालेल्या नाहीत. सततच्या तापमानातील चढउतारामुळे मानवी जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी सात वाजल्यापासून घरातून कामाच्या निमित्ताने बाहेर पडणारे नागरिक वाढत जाणार्याझ तापमानामुळे त्रस्त झाले आहेत. शरीराचे वाढलेले तापमान आणि पाण्याची कमी झालेली कमतरता भरून काढण्यासाठी नागरिक शीतपेयांचा आधार घेऊ लागले आहेत.
उन्हाळा आला की हा उन्हाळा सोसवेना असे म्हणण्याची वेळ सर्वांच्यावरच येते. गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या उन्हाळय़ात दुष्काळ झळा नसल्या तरी तापमान मात्र सर्वाधिक असे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्यामुळे शरीराला थंडावा देण्यासाठी शीतपेये आणि फळांचा आधार नागरिक घेत आहेत. रसयुक्त कलिंगड, खरबूज, काकडी या वेलयुक्त फळांना बाजारात मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली असून आरोग्यवर्धक आणि सर्व आजारांवर उपकारक असणारा उसाचा रस, आंब्याचा रस यांची मागणी वाढत आहे.
खिशाला परवडणारा असा उसाचा रस असल्यामुळे हा रस पिण्यासाठी लोकांची रसवंतीगृहात गर्दी दिसत आहे. अनेकांना कामाच्या निमित्ताने दिवसभर बाहेर फिरावे लागते, अशावेळी सतत पाणी प्यायल्याने तहान भागते, मात्र शरीराला हवा असणारा थंडावा मिळत नाही. मग शरीराची पाण्याची गरज भागविण्यासाठी दिवसभरात एकदा तरी थंडाव्याचा पदार्थ घ्यावा, अशी इच्छा प्रत्येकाची होते. त्यामुळे रसवंतीचा शोध घेऊन उसाचा एक ग्लास पोटात रिचवला जातो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.