गुजरात - हिमाचल विधानसभा निवडणूक : मतमोजणीला सुरुवात

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालीय. गुजरातच्या १८२ विधानसभा मतदारसंघात ही मतमोजणी होतेय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 20, 2012, 08:52 AM IST

www.24taas.com, अहमदाबाद
गुजरात - हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालीय. गुजरातच्या १८२ विधानसभा मतदारसंघात तर हिमाचल प्रदेशच्या ६८ जागांसाठी ही ही मतमोजणी होतेय. गुजरातमध्ये तीन कोटी ७८ लाख १५,३०६ मतदार असून हिमाचल प्रदेशमध्ये ४५ लाख १६०५४ मतदार आहेत. गुजरातच्या १८२ मतदारसंघांपैकी १३ अनुसूचित जातींसाठी व २६ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत, तर हिमाचल प्रदेशच्या ६८ मतदारसंघांपैकी १७ अनुसूचित जातींसाठी व ३ जमातींसाठी राखीव आहेत.
गुजरातचं महाभारत
मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या भवितव्याचा एकाअर्थानं आज फैसला होणार आहे. निकालाने भविष्यातील राजकारणाची वाटचालही स्पष्ट होणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरु होणार आहे. एकूण १८२ जागांवर सोळाशेपेक्षा अधिक उमेदवार आपलं नशिब आजमावतायेत. मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये जरी असली, तरी सौराष्ट्रमध्ये गुजरात परिवर्तन पार्टी काय कामगिरी करते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठीही ही निवडणूक निर्णायक मानली जातेय.
गेले काही दिवस गुजरातमध्ये सुरु असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा निकाल गुरुवारी लागणार आहे. सलग पाचव्यांदा भाजप सत्तेत येते का? नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप हॅट्रीक करणार का याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे. दोन टप्यात झालेल्या मतदानात ७० टक्के एवढे विक्रमी मतदान झाले. नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसने पूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान मनमोहन सिंह, सोनीया गांधी, राहुल गांधी यांनी विविध ठिकाणी अनेक सभा घेत मोदींवरील आरोप कसे चर्चेत राहतील याकडे लक्ष दिले. तर भाजपाच्या प्रचाराची पूर्ण भिस्त नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर अवलंबन राहिली. विकासाच्या मुद्यांवर भाजपने प्रचार सुरु केला तर केंद्र सरकारनं वेळोवेळी दिलेल्या निधीच्या सहाय्यानं गुजरातमधील विकास कामे होत असल्याचा मुद्दा काँग्रेसनं उचलून धरला. नरेंद्र मोदींच्या थ्रीडी तंत्रज्ञानाच्या सभांमुळेही निवडणुक चर्चेत राहिली.

भाजपची सौराष्ट्रमध्ये कशी कामगिरी असेल याकडे सर्वांचं नजरा आहेत. केशुभाई पटेल यांची गुजरात परिवर्तन पार्टी भाजपला ‘दे धक्का’ देणार का याची उत्सुकता सर्वांना आहे. मावळत्या विधानसभेतील भाजपाचे संख्याबळ ११७ आहे. जर ११७जागांपेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या तर नरेंद्र मोदींचा दिल्लीचा मार्ग सुलभ होणार आहे. मात्र त्यापेक्षा कमी विषेशत: १०० च्या खाली जर जागा भाजपला मिळाल्या तर मोदींचं राष्ट्रीय स्तरावरील स्थान डळमळीत होणार आहे. तेव्हा मतदार राजाने कोणाच्या बाजूनं कौल दिला आहे. हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.