संदीप जाधव
मानसोपचारतज्ज्ञ
सेक्स ही मूलभूत भावना आहे. ही सर्वांमध्ये जन्मतःच असलेली भावना मनुष्य सामाजिक जाणिवांचं भान राखत आणि नैसर्गिक भावनांचा आदर राखत प्रगल्भरीत्या परिपक्व व्हायला हवी. त्याच्यामुळे तुमच्या भावनिक क्षमता विस्तारायला हव्यात.
लैंगिक भावना सुदृढ होण्यासाठी लैंगिक शिक्षणाची अत्यंत आवश्यकता असते. मुलांना लैंगिक भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी मिळणारे मार्ग हे अधःपतनाकडे नेऊ शकतात. त्यामुळे भविष्यात एका विकृत माणसात अशा लोकांचं परिवर्तन होऊ शकतं. हे रोखणं समाजाच्याच हातात आहे.
लैंगिक शिक्षणानंतरही वयात येणाऱ्या मुलांना आत्मभान येईलच, याची शाश्वती नसते. त्यामुळे लैंगिक शिक्षणाला व्यक्तिमत्व विकासाची जोड देणं आवश्यक आहे. या बाबतीत पालक हेच मुलांचे पहिले आदर्श असतात. सिनेमातील हिरो-हिरोइन्सहूनही जवळचे आणि आदर्शवत वाटणारे आई-वडीलच जेव्हा मुलांना लैंगिक भावनांबद्दल समज देतील, तेव्हा मुलांच्या मनात निर्माण होणारे विकृत विचार शमतील. लैंगिक अथवा व्यक्तिमत्व घडणीमध्ये मुळात पालकांचे एकमेकांशी सैहार्द्रपूर्ण संबंध असणं खूप आवश्यक आहे.
जे पालक आपल्या मुलांच्या वयासोबत येणाऱ्या भावनांना स्वाकरून त्यांना समज देऊ शकतात, तेच पालक भविष्यात सुसंस्कृत नागरिक म्हणून मुलांना उभं करू शकतात. बलात्कार, फसवणूक, विनयभंग यांसारखे प्रकार थांबवण्यासाठी पौगंडावस्थेत लैंगिकतेबद्दल सकारात्मक भावना निर्माण करणं आणि त्याबद्दल आदर निर्माण करणं आवश्यक आहे. जर मुलांना सेक्सविषयी मोकळेपणाने सकारात्मक बाजू मांडत आत्मनियंत्रणाची माहिती पटवून दिली, तर सेक्सचं रूप हिडीस न राहाता ते एक भावनांचा आविष्कार ठरेल.
शब्दांकन- आदित्य दिलीप निमकर