निरुपमच्या तोंडाला मी काळं फासणारच...

विनोद घोसाळकर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे. कारण माझ्या पदापेक्षा मला नेहमीच मराठी स्वाभिमान हा मला हजारपटीने जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण, मी हाडाचा शिवसैनिक आहे. हे संजय निरुपमने लक्षात ठेवावं.

Updated: Nov 2, 2011, 06:13 PM IST

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. आमच्या शिवसेनेचा झेंडा तिथे दिमाखात फडकतो. या गोष्टीचा अर्थातच काही लोकांना त्रास होतोय. पण, निवडणूकीत किंवा सरळ मार्गाने आम्हाला हरवणं ज्यांना कठीण जातं अशी लोकं मग वाट्टेल त्या कारणांनी मराठी माणसाच्या भावना भडकवायला लागतात. संजय निरुपमसारखा माणूस... याने उत्तर मुंबईचा तरी काय विकास केलाय? त्यामुळे मतं मागायला याच्याकडे विकासाचा मुद्दा नाही. मराठी माणूस तर त्याला उभं करणार नाही. त्यामुळे बेछुट वक्तव्य करून त्याला असं वाटलं की उत्तर भारतीयांचा तरी आपल्याला पाठींबा मिळेल. पण, हा पाठिंबा मिळवण्यासाठी त्याने आपली मर्यादा ओलांडली.

 

त्यात अबू आजमीचे बोल तर विचारात घ्यायचीही गरज नाहीये. त्याचं वक्तव्य निव्वळ राजकीय स्टंटबाजी आहे. पण, याची सुरूवात केली ती निरुपमनेच. प्रांतवादाचा मुद्दा आत्ता कुठेच नव्हता. मंत्रीमंडळात डॉ. राममनोहर त्रिपाठींसारखी विद्वान माणसंही बसत होती. ते उत्तर भारतीय असूनही त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात  तमाम जनतेला आदर होता. पण, आजचे उत्तर भारतीय नेते तसे नाहीत.  निरुपमसारखा माणूस केवळ मतांसाठी वाट्टेल ते बोलतो. त्याचं महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे ?  सगळं काही अलबेल असताना उगीचच वादाची ठिणगी पेटवली ती या संजय निरुपमनेच. या संजय निरुपमला खाजवून खरुज काढायची सवय आहे. आणि शिवसेना कधीही स्वतःहून हात उचलत नाही. निरुपम, अबू आजमीसारखे लोकच मुंबईच येऊन मुंबईची शातता भंग करतात. अशा लोकांनी का राहावं मुंबईत ? मुंबई म्हणजे वाटली काय यांनी ? म्हणे उत्तर भारतीय ती चालवतात ! महाराष्ट्र असा फुकटमध्ये मिळाला नाहीये. जरा जाऊन मुंबईचा इतिहास वाचा. अभ्यास करा. या मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी कितीजणांनी बलिदान केलंय ते समजून घ्या. मुंबईसाठी जीव दिलाय तो मराठी माणसाने. रक्त सांडलंय त्याने आणि ती मुंबई उत्तर भारतीय चालवतात ! असं म्हणून स्वतःच मुंबईची शांतता भंग करणाऱ्या आणि निव्वळ मराठी माणसाच्या भावना दुखावणाऱ्या निरुपमकडे दुर्लक्ष करणं आता शक्य नाही. कारण तो काँग्रेसचा खासदार आहे. त्याच्या म्हणण्याचे राजकीय पडसाद उमटणारच.

 

वर तो निरुपम म्हणतो की आदरणीय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी सुरक्षेशिवाय फिरुन दाखवावं! निरुपमला काय अधिकार आहे त्यांच्या सुरक्षेबद्दल बोलायचा ? अशा माणसाला एक सच्चा  शिवसैनिक म्हणून उत्तर देणं मी माझे कर्तव्य मानतो. म्हणूनच मी संजय निरुपमच्या उत्तर मुंबईत ठिकठिकाणी लावलेल्या ३००- ३५० बॅनर्सला काळं फासलं. पण, नुसतं बॅनरला काळं फासून काय होणार? मी तर त्याला आव्हान दिलंय. तो म्हणेल तिथे पोलीस, सुरक्षा असताना येऊन त्याच्या तोंडाला मी काळं फासेन. मात्र मी एक आमदार आहे. लोकप्रतिनिधी आहे. माझ्या या वागण्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये असं मला वाटतं. म्हणूनच मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे. कारण माझ्या पदापेक्षा मला नेहमीच मराठी स्वाभिमान हा मला हजारपटीने जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण, मी हाडाचा शिवसैनिक आहे. हे संजय निरुपमने लक्षात ठेवावं.