अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन देशवासियांसाठी राष्ट्रीय आंदोलन उभारलं. देश भ्रष्टाचार मुक्त करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. किरण बेदी या अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधातील लढाईतील फौजेपैकी एक आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलनकर्त्याने पावित्र्य जपावं ही लोकांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. किरण बेदींना मुलीचा दाखला मिळण्यासाठी तडजोड केल्याचं सांगितले, कदाचीत ते एका आईने आपल्या मुलीच्या प्रेमापोटी केलं असावं. पण तरीही हे गंभीर आहे.
आता किरण बेदी आपण कार्यक्रमांसाठी प्रवास इकोनॉमीने करतो आणि आयोजकांकडून बिझनेस क्लासचे पैसे घेतो असं म्हणत आहेत. आणि हे वाचवलेले पैसे आपण आपल्या संस्थेच्या मार्फत जनहितासाठी वापरत असल्याचेही त्यांचे म्हणणं आहे. सरकारने शौर्य पदकाने सन्मानित बेंदींना एअर इंडियाच्या विमान प्रवासासाठी ७५ टक्के सवलत दिली आहे त्याचाही सवलतीचाही लाभ त्या घेतात. याचा अर्थ असे पैसे जमवायला त्यांची हरकत नाही. पण, मग किरण बेदी अशा तडजोडी करत असतील तर त्यांना आमदार खासदार लोकप्रतिनिधींच्या भ्रष्टाचाराबद्दल टीका करण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार आहे का? याचं उत्तर शोधायला पाहिजे. आमदार खासदारांना गणेशोत्सव, नवरात्रौत्सव असे अनेक प्रकारचे खर्च असतात त्यांनी जर त्यासाठी पैसे जमवले तर तो भ्रष्टाचार आणि हा नाही. अण्णांच्या सहवासाचा आणि संस्काराचा अण्णांचा हा अपमान आहे असं मला वाटतात.
प्रत्येक माणूस आपण शुर्चिभूत आहोत की नाही यापेक्षा देवासाठी पूजाअर्चा करताना ती करणारा ब्राहमण शुर्चिभूत असला पाहिजे यासाठी आग्रही असतो. त्याच प्रमाणेच टीम अण्णाकडे त्याच अपेक्षेने बघते. याआधीही अण्णांच्या टीममधील प्रशांत भूषण यांनी काश्मीर संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यांचे हे वक्तव्य राष्ट्रद्रोही असल्याचे माझे मत आहे. पण अण्णांनी त्यांची टीममधून हकालपट्टी केली नाही. अण्णा यांनी फक्त प्रशांत भूषण यांच्या मताशी आपण सहमत नाही आणि ते त्यांचे व्यक्तीगत मत असल्याचं म्हटलं आहे. आता उद्या टीम अण्णांपैकी एखाद्याने भ्रष्टाचार किंवा बलात्कार केला तर मग अण्णा त्याच्या बाबतीतही प्रशांत भूषणांच्या संदर्भात घेतलेली भूमिका घेतील का? नैतिकतेवर आधारीत आंदोलनात नैतिकतेची जपणूक करण्यावर सर्वाधिक भर द्यायला हवा असं मला वाटतं. आज लोकांना मी कसा आहे? लोकं भ्रष्टाचाराला कंटाळली आहेत. आणि त्यांचा अण्णांच्या पावित्र्यावर अधिक विश्वास आहे आणि तो जपणं महत्वाचं आहे.
शब्दांकन- मंदार मुकुंद पुरकर