www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या सेंट झेवियर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. फ्रेझर मस्करन्स यांनी कॉलेजच्या वेबसाईटवर राजकीय सल्ला देणारा संदेश प्रसारीत केल्यामुळं वाद निर्माण झालाय. गुजरातचा विकास खोटा असल्याचा दावा यात करण्यात आला असून विचार करून मतदान करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आलाय.
विशेष म्हणजे प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना ई मेल पाठवूनही याबाबत सल्ला दिलाय. मात्र यावर मुंबई भाजपनं आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं सेंट झेवियर्सचे प्राचार्य डॉ. फ्रेझर मस्करन्स वादात सापडले आहेत.
या विषयावर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी झी २४ तासशी बोलताना तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलीय. झेवियर्सच्या प्राचार्यांसाठी प्रश्न विचारण्यात येत आहेत. आपली राजकीय मतं कॉलेजच्या वेबसाईटवर प्रकाशित करुन विद्यार्थ्यांनाही तशाच प्रकारचा सल्ला देऊन शिक्षण क्षेत्रातही तुम्ही राजकारण आणतायं असं मानावं का ?
दरम्यान, तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी या भूमिकेवर नाराज आहेत, असं समजतंय, भाजपाही निवडणूक आयोगाकडं तक्रार करणार असल्याची माहिती आहे, आता तरीही तुम्ही तुमच्या या भूमिकेवर ठाम असणार का, असा सवाल विचारण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.