www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदींनी प्रियांका गांधींना ‘बेटी’ संबोधल्यावरून राजकारण सुरू झालंय. मात्र, नरेंद्र मोदींनी कधीच प्रियांका गांधींना आपली बेटी म्हटलं नाही, असं जाहीर करत भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ऑफिसनं या चर्चेतील हवाच काढून टाकलीय.
मोदींच्या बॅक ऑफिसनं आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी एक व्हिडिओ जाहीर केलाय. हा व्हिडिओ मोदींच्या दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीचा भाग आहे तो भाग आहे जो भाग दूरदर्शननं वगळलाय.
या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदींनी प्रियांका गांधींना ‘बेटी’ संबोधलंच नसल्याचं दाखवण्यात आलंय. तर या मुलाखतीत मोदी म्हणतात, एक मुलगी आपली आई (सोनिया गांधी) आणि भाऊ (राहुल गांधी) यांचा प्रचार तर करेलच. याशिवाय या व्हिडिओमध्ये मोदी म्हणतात... प्रियांकानं कितीही हल्ले चढविले तरी ते त्याला प्रत्यूत्तर देणार नाहीत.
या व्हिडिओमध्ये मोदी म्हणतात, ‘या सगळ्या गोष्टींना मी फार गंभीरतेनं घेत नाही कारण, कोणतीही मुलगी आपली आई आणि भावासाठी काहीही म्हणू शकते... मला वाचतं की, ती मुलगी आपली आई आणि भावाचा प्रचार तर करणारच... जर मुलगी आपल्या आईसाठी प्रचार नाही करणार तर कुणासाठी करेल? एक मुलगी आपल्या भावाचा प्रचार करणार नाही तर ती कुणासाठी करेल? मुलगी आपल्या आईचाच प्रचार करेल...’ हा मोदींच्या त्याच मुलाखतीचा एक भाग आहे जो दूरदर्शननं दाखवणं टाळलं होतं.
महत्त्वाचं म्हणजे, काल भाजपनंच आरोप केला होता की दूरदर्शनवर दाखवण्यात आलेल्या नरेंद्र मोदींच्या मुलाखतीत त्यांनी प्रियांका गांधींवर केलेली टिप्पणी मुलाखतीतून वगळण्यात आलीय. याबाबतीत भाजपनं सरकारकडे उत्तराची मागणी केलीय. तर काँग्रेसनं मात्र या मुद्द्यालाच उडवून लावलंय.
भारतीय जनता पार्टीचे (भाजप) नेते रविशंकर प्रसाद यांनी, नरेंद्र मोदींची संपूर्ण मुलाखत प्रसारित केली जावी... त्यामधील कोणताही भाग वगळला जाऊ नये अशी मागणी केलीय. नरेंद्र मोदींची ही मुलाखत दूरदर्शनवर 27 एप्रिल रोजी प्रसारित करण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.