www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नरेंद्र मोदींच्या लग्नावरून वादंग निर्माण झालेला असतानाच, अखेर शिवसेनेने या वादात उडी घेतली. ‘आधी राहुलबाबांना बाशिंग बांधा आणि मग मोदींच्या लग्नाची चर्चा करा!" अशा मिश्कील पण तितक्याच घणाघाती शब्दात शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनातून काँग्रेसवर तोंड सुख घेतले.
सामनाच्या अग्रलेखात, "काँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि व्यभिचाराचे गटार झालं आहे. काँग्रेसवाले आज नरेंद्र मोदींच्या लग्नावरून आणि त्यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्यावरील कथित अन्यायावरून स्वत:चा फायदा करून घेऊ पाहत आहे. नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या उमेदवारी अर्जात आपण विवाहित असल्याचे सांगितलं आहे. मात्र,या आधी त्यांनी लढवलेल्या निवडणुकांमध्ये जी प्रतिज्ञापत्रे सादर केली, त्यात विवाह झाल्याचा कुठलाही उल्लेख नव्हता. त्यामुळे मोदी यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यासाठी काँग्रेसच्या वकिलांनी प्रयत्न चालवला आहे. ज्या काँग्रेसच्या युवराजांना अजून स्वत:चे लग्नकार्य करता आले नाही आणि ज्यांच्या मुंडावळ्या सुकून गेल्या आहेत त्यांनी मोदी यांच्या अंधारातील कुटुंबाविषयी कळवळा व्यक्त केला आहे.’अशा शब्दात शिवसेनेने काँग्रेसचा समाचार घेतला.
मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी पंतप्रधान व्हावेत, यासाठी उपास-तापास करीत आहेत. म्हणूनच मोदी हे कायद्याच्या कचाट्यात सापडतील,असे ज्यांना वाटते ते मूर्खांच्या नंदनवनात रांगत आहेत. तसेच मोदी यांच्या लग्नाचा विषय लावून धरल्याने देशातील महागाई आणि भ्रष्टाचार कमी होणार आहे का? असा खडा सवाल देखील शिवसेनेकडून काँग्रेसला विचारण्यात आला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.