www.24taas.com,झी मीडिया, अमेठी
आज देशात आठव्या टप्प्यातील मतदान होतंय. राहुल गांधीचं भवितव्य आज इव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यंदा राहुल गांधी तिसऱ्यांदा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. मात्र यंदा पहिल्यांदाच मतदानाच्या दिवशी राहुल गांधी अमेठीत आहे आणि पहाटेपासून मतदारांना भेटताना दिसत आहेत. यावरून राहुल गांधी स्मृती इराणी आणि कुमार विश्वास यांच्या आव्हानाला घाबरले की नरेंद्र मोदींना? हेच त्यांच्या या कृतीवरून दिसून येतंय.
तर दुसरीकडे अमेठीमध्ये राहुल गांधींचे कार्यकर्ते बूथ कॅप्चरिंग करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे अमेठीतले उमेदवार कुमार विश्वास यांनी केला आहे. अमेठीतील अनेक केंद्रांवर काँग्रेसच्या कार्यकर्ते मतदारांना दमदाटी करुन पंजावर शिक्का मारण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप विश्वास यांनी केला आहे. अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्यापर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचल्या आहेत. पण कोणीही त्याची दखल घेत नसल्याचा दावा कुमार विश्वास यांनी केला.
कुमार विश्वास यांनी गेल्या तीन-चार महिन्यांपासून अमेठीत ठाण मांडलंय तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्यासाठी अमेठीत सभा घेतली. यामुळं काँग्रेसचं धाबं दणाणलं आहे. लोकांचं मत ऐनवेळी भाजपच्या उमेदवाराला पडू नये म्हणून चक्क राहुल गांधी यांनाच अमेठीत थांबवण्यात आलंय.
राहुल यांनी पहाटेपासूनच अमेठीत फेरफटका मारण्यास सुरुवात केली. सव्वासातच्या सुमारास त्यांनी काही मतदान केंद्रांनाही भेटी दिल्या. मतदारांना काही अडचणी येताहेत का याची माहिती घेतली. मतदान केंद्रांच्या पाहाणी सोबतच आजूबाजूच्या लोकांना भेटून त्यांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याचं आवाहन सुद्धा राहुल गांधी करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.