काँग्रेसच्या भूमिकेमुळे नाशिकमध्ये आरपीआयचा महापौर करुन सत्तास्थापनेचा राष्ट्रवादीचा फॉर्म्युला बारगळल्याची चिन्हं दिसत आहेत. छगन भुजबळ यांनी आठवलेंना आरपीआयचा महापौर करण्याची ऑफर दिली होती. भुजबळांनी त्यासाठी सेना, भाजपची मदत मिळवून द्या, असं आठवलेंना सांगितलं होतं. पण त्यानंतर राष्ट्रवादीनं काहीच प्रतिसाद दिला नाही, असं आठवलेंनी सांगितलं. मात्र वेळ जाईल तशी गणितं जमतील, असा आशावादही आठवलेंनी व्यक्त केला आहे.
नाशिक महापालिकेत महापौरपदासाठी रामदास आठवलेंच्या रिपाइं उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्टपणे राष्ट्रवादीला सांगण्यात आल्याचं वृत्त आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे छगन भुजबळांना मोठा हादरा बसला आहे.
महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असेल तरच पाठिंबा देऊ असं काँग्रेसने निक्षुन सांगितलं आहे. नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर होऊ नये म्हणून छगन भुजबळांनी रामदास आठवलेंच्या रिपाइंला महापौरपदाची ऑफर दिली होती. आठवलेंच्या रिपाइंचे चार नगरसेवक निवडून आले आहेत.
नाशिक महापालिकेच्या १२२ जागांपैकी मनसेने सर्वाधिक ४० जागा मिळाल्याने त्यांचा महापौर होण्याची शक्यता अधिक असल्याने छगन भुजबळांनी ही राजकीय खेळी खेळली होती. राष्ट्रवादीचे २० तर काँग्रेसचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत तर अपक्षांची संख्या १० आहे. शिवसेनेच्या १९ आणि भाजपच्या १४ नगरसेवकांचा पाठिंबा मिळवावा असं भुजबळांनी आठवलेंना सांगितलं. पण काँग्रेसच्या या पवित्र्याने भुजबळांची अडचण होणार आहे.