www.24taas.com, मुंबई
मनसे आमदार बाळा नांदगावकर विधानसभेतील गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. सल्लागार समिती बैठकीला नांदगावकर गैरहजर राहिल्याने याला आता दुजोरा मिळाला आहे.
शिवडी, परळ, लालबाग या त्यांच्या मतदारसंघात मनसेचा एकही उमेदवार निवडून न आल्यानं पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यांच्या मतदारसंघातील सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत. सोमवारी दक्षिण मध्य मुंबईतल्या मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी पद सोडण्याची तयारी दाखवली होती. तसंच मंगळवारच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला बाळा नांदगावकर गैरहजर राहिल्यानं गटनेतपद सोडण्याच्या शंकेला बळ मिळालं होतं.
सोमवारच्या बैठकीत त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच निवडणुकीत पक्षाशी दगाबाजी केल्याचा आरोप केला होता. दरम्यान बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी राज ठाकरेंच्या कृष्णकंज या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भेट होऊ शकली नाही. त्यामुळं नाराज नांदगावकरांनी आता राज ठाकरेंनी बोलावल्याशिवाय पुन्हा भेटीसाठी न जाण्याचा निर्णय घेतलाय.