www.24taas.com, मुंबई
नाशिकच्या सत्ता समीकरणात दिवसेंदिवस नवी रंगत येते आहे. मुंबईत महापौरपदाची मागणी करणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरेंनी थेट नाशिकच्या महापौरपदाची ऑफर देऊन नवा गुगली टाकली आहे. मनसे आणि भाजपची जवळीक पाहून त्यांनी भाजपला नवा प्रस्ताव देऊन कोंडीत पकडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपनं दबावतंत्र सुरु केल्यानं थेट नाशिकच्या महापौरपदाचा प्रस्ताव भाजपपुढे ठेवत कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुगली टाकली आहे. मुंबई, ठाण्याचं महापौरपद शिवसेनेकडे ठेवताना, भाजपनं नाशिकमध्ये महापौर करावा, शिवसेना त्यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना दिल्याचं सांगण्यात येतं आहे.
नाशिकचा महापौर महायुतीचा होईल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला खरा, पण त्याची रणनीती स्पष्ट करायला मात्र त्यांनी नकार दिला. अर्थात मातोश्रीवर उद्धव ठाकरेंबरोबर झालेल्या बैठकीत ही रणनीती काहीशी स्पष्ट झाली होती. एक टर्मसाठी मुंबईचं महापौरपद मागणाऱ्या भाजप नेत्यांना उद्धव ठाकरेंनी थेट नाशिकच्या महापौरपदाचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या प्रस्तावानं उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना वेगळ्याच कोड्यात टाकलं आणि भाजप-मनसेच्या वाढत्या मैत्रीच्या पार्श्वभूमीवर नवी गुगली टाकून नाशिकच्या राजकीय समीकरणांची रंगत वाढवली आहे. मनसेला पाठिंबा देऊन सत्तेत जाण्याच्या भाजपच्या मनसुब्यांना या प्रस्तावानं सुरुंग लागला आहे. इतकंच नाही तर मुंबई, ठाण्यात शिवसेनेचा महापौर आणि नाशिकात भाजपचा असं सांगून भाजपच्या मुंबईवरच्या दाव्याचीही हवाच काढून घेतल्याची चर्चा त्यामुळे सुरु झाली. त्यामुळं नाशिकमध्ये मनसेचं इंजिन सोबत जोडण्याची घाई झालेल्या भाजपवाल्यांची पुरती पंचाईत झाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये युतीचाच महापौर होईल, असा दावा भाजप नेते करत आहेत.
नाशिकमधल्या नव्या समीकरणांमुळे चित्रही बदलू लागलं आहे. शिवसेनेनं भाजपला महापौरपदासाठी पाठिंबा देऊन मनसे तटस्थ राहिल्यास महायुतीला सत्तेची संधी आहे. मुंबई महापालिकेत महापौरपदाची मागणी करुन भाजपनं दबावतंत्र सुरु केलं. त्याला नाशिकची ऑफर देत उद्धव यांनी मुरब्बीपणा दाखवून दिला. आता भाजपची विचित्र झाली आहे. ऑफर स्वीकारली तर पराभवाचा धोका, नाकारली तर मनसेप्रेम उघड होण्याची भीती अशी गोची भाजपची झाली आहे.
भाजपनं महापौरपद लढवायचं ठरवलं तर सर्वाधिक ४० जागा जिंकणारे मनसे काय करणार हा औत्सुक्याचा भाग आहे. त्यामुळं जसा मार्चचा पहिला आठवडा येईल तसे नाशिकच्या सत्ता समीकरणाचे रंग बदलत राहतील.
काय आहे नाशिक महापालिका निवडणुकीतील पक्षीय बलाबल.
एकूण जागा १२२
मनसे ४० जागा
शिवसेना १९
भाजप १४
रिपाई ३
अपक्ष ६
जनराज्य २
माकप ३
राष्ट्रवादी २०
काँग्रेस १५