हातपाय गळाले, आम्हाला नको हातकणंगले...

एरव्ही जागावाटपाबाबत आणि मतदारसंघ पदरात पाडून घेण्याबाबत रस्सीखेच करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हातकणंगले मतदार संघाबाबत मात्र हात आखडता घेताना दिसतायत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 20, 2014, 08:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, हातकणंगले
एरव्ही जागावाटपाबाबत आणि मतदारसंघ पदरात पाडून घेण्याबाबत रस्सीखेच करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हातकणंगले मतदार संघाबाबत मात्र हात आखडता घेताना दिसतायत. हा मतदारसंघ घ्यायला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही इच्छूक नाहीत असं चित्र आहे. त्याचं कारण आहे अर्थातच राजू शेट्टी... राजू शेट्टींच्या विरोधात लढून आपली कारकीर्द पणाला लावयला एकही नेता तयार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला असणारा हातकणंगले मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जाणार हे आता जवळजवळ निश्चित आहे. राजू शेट्टी यांचं या मतदार संघातलं आव्हान पेलण्यास राष्ट्रवादीचे कोणतेही नेते तयार नाहीत. हा मतदार संघ काँग्रेससाठी सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखवलीय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कल्लप्पा अण्णा आवाडे यांना या मतदार संघातून उमेदवारी दिली तर विजयाचा मार्ग सूकर होईल, असा आशावाद राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय.
एकीकडे राष्ट्रवादीचे नेते हातकणंगले काँग्रेसला बहाल करतायत तर दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीच्या या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. राष्ट्रवादीला हातकणंगले का नको...? हातकणंगले मतदार संघावर आमचा हक्क कसा? असा सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी विचारलाय.
एकीकडे राष्ट्रवादीचे नेते जास्तीतजास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ सोडायला राष्ट्रवादी सहज तयार झाली. यावरूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी राजू शेट्टींचा किती धसका घेतलाय, हे दिसून येतंय. आता हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला तर इथे कल्लप्पा अण्णांना राजू शेट्टींशी दोन हात करावे लागणार हे स्पष्ट आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.