www.24taas.com, झी मीडिया, अमरावती/अकोला
अमरावतीमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडली. आनंदराव अडसूळांच्या प्रचारासाठी मोदी आज अमरावतीमध्ये दाखल झाले होते. यावेळी शेतकरी आत्महत्यांवरून मोदींनी राज्यसरकार आणि शरद पवारांना चांगलच धारेवर धरलं.
सभेची सुरूवातच मराठी भाषेतून करत मोदींनी अमरावतीकरांवर छाप पाडली. आघाडी सरकारवर जोरदार टीक करत गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या शुभमुहूर्तावर सर्वांनी काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न पाहा, असं आवाहन मोदींनी यावेळी केलं.
विशेष म्हणजे आजची मोदींची सभा खास म्हणावी लागेल. कारण या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे मोदींकडून झालेला बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख. याआधी नरेंद्र मोदींनी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या, मात्र त्यांनी बाळासाहेबांचं नाव कधीही घेतलं नव्हतं. भाजप महायुतीमधील पक्ष असून नरेंद्र मोदी आपल्या भाषणात बाळासाहेबांचं नाव कधीही घेत नाही, अशी टीका त्यांच्यावर होत असे. मात्र यावेळी त्यांनी बाळासाहेबांचं कार्य पुढे सुरु ठेवण्याचं आवाहन केलं.
तसंच राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन गुजरातच्या विकासाचा हिशेब मागतात, पण निवडणुका गुजरातच्या नाही, भारताच्या आहेत, असं सांगत त्यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला. अमरावतीनंतर नरेंद्र मोदींची अकोल्यातही सभा झाली. या सभेतही त्यांनी यूपीए सरकारवर टीकेची झोड उठवली.
दरम्यान, महाराष्ट्र हे सेक्यूलर राज्य आहे त्यामुळं मोदींची जादू इथं चालणार नाही अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिलीये. आज नांदेडमध्ये सुद्धा मोदींची सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर अशोक चव्हाण बोलत होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.