www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. याला प्रस्तावाला मुरली मनोहर जोशी, माजी अध्यक्ष नितीन गडकरी, सुषमा स्वराज, गोपीनाथ मुंडे, रविशंकर प्रसाद, व्यंकय्या नायडू यांनी अनुमोदन दिले.
भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत मोदी यांच्या नावाची घोषणा तसेच प्रस्ताव ठेवण्याचे लालकृष्ण अडवाणी यांना सांगण्यात आले. यावेळी अडवाणी यांनी संसद सभागृहाचे महत्व स्पष्ट केले. त्यानंतर मोदींच्या नावाचा प्रस्ताव खासदारांसमोर ठेवला. या प्रस्तावाला सर्वप्रथम मुरलीमनोहर जोशी यांनी अनुमोदन दिले. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या उंबरठ्यावर डोकं टेकवलं. नरेंद्र मोदी पहिल्यांदाच संसद भवनात दाखल झाले.
आजचा दिवस ऐतिहासिक दिवस असल्याचं सांगत गडकरींनी मोदींसोबत आपणही संसद भवनात पहिल्यांदाच आल्याचं नमूद केलं.
यावेळी मुरलीमनोहर जोशी यांनी प्रथमच बिगर काँग्रेस सरकार बहुमताच्या जोरावर संसदेत आले आहे. हा भाजपचा ऐतिहासिक विजय आहे, असे सांगत मोदी यांच्या नावाला अनुमोदन दिले. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मोदींसोबत मीही पहिल्यांदाच संसद भवनात आलोय, असे उद्गार नितीन गडकरी यांनी अडवाणी यांच्या प्रस्तावाला अनुमोदन देताना काढलेत. सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, रविशंकर प्रसाद, गोपीनाथ मुंडे यांच्यासहीत नविन लोकसभा सदस्य़ांकडून मोदींच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन मिळालं.
त्यानंतर पक्षाध्यक्ष आणि निर्वाचन अधिकाऱ्यांची भूमिका पार पाडणारे राजनाथसिंग यांनी मोदींच्या निवडीची घोषणा केली. संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला पक्षाचे सर्व खासदार, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यसभेतील सदस्य उपस्थित होते. याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना कधीही सेंट्रल हॉलमध्ये येण्याचा योग आला नसल्याचे मोदींनी आपल्याला सांगितल्याचे राजनाथसिंग म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.