मोदी सरकारचा भाग बनण्यात आडवाणींना रस नाही!

वेगवेगळ्या एजन्सीजच्या एक्झिट पोलच्या दाव्यांनुसार, निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीचंच सरकार देशात प्रस्थापित होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवण्यात गेलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 14, 2014, 12:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
वेगवेगळ्या एजन्सीजच्या एक्झिट पोलच्या दाव्यांनुसार, निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीचंच सरकार देशात प्रस्थापित होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवण्यात गेलीय. अशात भाजपलाही आपल्याच पक्षाचं सरकार सत्तेत येईल अशी खात्री आहे त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतरच्या रणनीतीवर पक्षात आत्तापासूनच मंथन सुरू झालंय.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना मोदींच्या नेतृत्वाखाली बनविल्या जाणाऱ्या सरकारचा भाग बनण्याची अजिबात इच्छा नाही. अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी आडवाणी मोदी सरकारमध्ये केवळ सल्लागाराची भूमिका निभावणार आहेत. सोबतच ते एनडीएच्या अध्यक्षपदावरही कायम राहतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भाजप दोन सत्ताकेंद्राच्या विरुद्ध आहे.
भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासोबत अरुण जेटली आणि नितीन गडकरी यांनी बुधवारी गांधीनगरमध्ये नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. याच भेटीत पक्षातले ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या भूमिकेवरदेखील चर्चा होणार आहे. भाजपचे तीनही नेते आज दुपारी तीन वाजता गांधीनगरला दाखल होणार आहेत. ते एअरपोर्टपासून सरळ मुख्यमंत्री निवासस्थानावर दाखल होती. तिथंच सायंकाळी त्यांची बैठक होईल.
एक्झिट पोलमध्ये मोदींचं सरकार आल्यानंतर आडवाणी यांच्या भूमिकेवर सस्पेन्स कायम आहे. एनडीएचं अध्यक्षपद त्यांना दिलं जाऊ शकतं, असा कयास आहे... पण, हे पद तर त्यांच्याकडे आधीपासूनच आहे. यापूर्वी मोदींचे जवळचे समजले जाणारे अमित शाह यांनी आडवाणी यांच्या भूमिकेवर विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना, याचा निर्णय संसदीय बोर्डाच्या बैठकीत केला जाईल, असं म्हटलं होतं. खुद्द आडवाणी यांनीही अजून शांत राहणंच पसंत केलंय.
दुसरीकडे, भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आडवाणी आमचे प्रेरणास्त्रोत असल्याचं म्हटलंय तसंच तेच पक्षाचे मार्गदर्शक राहतील, असं म्हणत ‘मोदी सगळ्यांना सोबत घेऊन पुढे वाटचाल करू इच्छितात’ अशी पुश्तीही जोडलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.