धुळ्यात `एम` फॅक्टर कोणाला तारणार!

धुळे लोकसभा निवडणूक पूर्णपणे जातीच्या समीकरणात अडकलीय. या निवडणुकीत चार `एम` फॅक्टर काम करणार आहेत. मराठा, मुस्लिम, मोदी आणि मनी हे चार घटक कोणाच्या बाजूनं कसं काम करतात यावरच इथला विजयाचा मानकरी ठरणार आहे. या चार घटकांपैकी दोन काँग्रेसच्या तर दोन भाजपच्या बाजूनं दिसतायत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 13, 2014, 09:03 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, धुळे
धुळे लोकसभा निवडणूक पूर्णपणे जातीच्या समीकरणात अडकलीय. या निवडणुकीत चार `एम` फॅक्टर काम करणार आहेत. मराठा, मुस्लिम, मोदी आणि मनी हे चार घटक कोणाच्या बाजूनं कसं काम करतात यावरच इथला विजयाचा मानकरी ठरणार आहे. या चार घटकांपैकी दोन काँग्रेसच्या तर दोन भाजपच्या बाजूनं दिसतायत.
लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणूक ही काँग्रेससाठी अस्तित्वाची लढत आहे. महायुतीनंही ही जागा कायम ठेवण्यासाठी कंबर कसलीय. धुळ्यातल्या या निवडणुकीत एक दोन नव्हे तर तब्बल चार `एम` फॅक्टरनी विकासाच्या मुद्याला दुय्यम स्थानावर ठेवलंय. या लोकसभा मतदारसंघात चार लाखांहून अधिक मुस्लीम मतदार असून साडेपाच लाख मराठा-पाटील समाजाची मतं आहेत. त्यामुळं हे दोन समाज एकाच वेळी कुठल्या पक्षाच्या पाठीमागे उभे राहिले तर उमेदवार आणि मुद्दे गौण होतात.
या मतांचं विभाजन होऊ नये याची काळजी काँग्रेसनं घेतलीय. एकीकडे मोदीची भिती दाखून मुस्लिम समाजाला एकत्र आणण्याचं काम काँग्रेसचे अल्पसख्यांक नेते जोरदार करताय. तर दुसरीकडे काँग्रेसचे सर्व मराठा नेते एका छताखाली आलेत. जे बंडखोरीच्या तयारीत होते ते सुभाष देवरे आणि सत्यजित गायकवाड यांचंही बंड क्षमवण्यात काँग्रेस उमेदवार अमरीश पटेल यांना यश आलंय. रोहिदास पाटलांवरही पटेलांची मोहिनी काम करून गेलीय.
काँग्रेसकडे मुस्लिम आणि मनी असे दोन एम फॅक्टर आहेत तर भाजपकडे मोदी आणि मराठा उमेदवार हे दोन एम फॅक्टर काम करतील. त्यातच सुभाष भामरेंना विरोध करणारी शिवसेनाही मतभेद विसरून नेटानं प्रचारात उतरलीय.
जातीय समीकरणांवर काँग्रेस आघाडी आणि महायुतीची भिस्त आहे. त्यामुळं मतविभागणी टाळण्याचे डावपेच दोन्ही बाजूंकडून आखले जातायत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.